Wed, May 19, 2021 04:54होमपेज › National › देशात सक्रिय रुग्ण केवळ 4.85 टक्के

देशात सक्रिय रुग्ण केवळ 4.85 टक्के

Last Updated: Nov 22 2020 10:41PM

संग्रहित फोटोनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

देशात गेल्या 24 तासांत 45 हजार 209 कोरोनाग्रस्तांची भर पडली, तर 501 कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे शनिवारी दिवसभरात 43 हजार 493 रुग्णांनी कोरोनावर मात केली. भारतातील एकूण कोरोना रुग्णसंख्या त्यामुळे 90 लाख 95 हजार 806 झाली आहे. यातील 85 लाख 21 हजार 617 रुग्ण कोरोनातून पूर्णत: बरे झाले आहेत, तर 4 लाख 40 हजार 962 रुग्णांवर (4.85 टक्के) उपचार सुरू आहेत. दुदैवाने आतापर्यंत 1 लाख 33 हजार 227 रुग्णांचा (1.46 टक्के) कोरोनाने बळी घेतला. रविवारी देशाचा कोरोनामुक्ती दर 93.69 टक्के नोंदविण्यात आला.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, गेल्या 24 तासांत राजधानी दिल्लीत सर्वाधिक 5 हजार 879 कोरोना रुग्ण आढळले. केरळ 5772, महाराष्ट्र 5760, पश्‍चिम बंगाल 3639, राजस्थान 3007 तसेच छत्तीसगडमध्ये 2666 कोरोनाबाधित आढळले. तर दिल्लीत सर्वाधिक 111 मृत्यू झाले. महाराष्ट्र 62, पश्‍चिम बंगाल 53, केरळ 25, हरियाणा 25 तसेच उत्तर प्रदेशात 24 मृत्यू झाले. देशात आतापर्यंत 13 कोटी 17 लाख 33 हजार 134 कोरोना तपासण्या झाल्या असून, शनिवारी 10 लाख 75 हजार 326 कोरोना तपासण्या झाल्याची माहिती आयसीएमआर ने दिली. मध्यप्रदेशात कोरोनामुळे रुणालयात दाखल होणार्‍या 20 ते 25 टक्के रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागत आहे. 

9 राज्यांत 20 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण 

देशातील 9 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये 20 हजारांहून अधिक सक्रिय कोरोनाबाधित आहे. यामध्ये हरियाणा, छत्तीसगड, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, पश्‍चिम बंगाल तसेच दिल्लीचा समावेश आहे, तर केरळ (66,982) तसेच महाराष्ट्रात (80,878) 50 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.

कोरोना मृत्यूदर या राज्यांत सर्वाधिक 

कोरोना मृत्यूदराच्या राष्ट्रीय सरासरीच्या (1.46 टक्के) तुलनेत 13 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये मृत्यूदर जास्त आहे. पंजाबमध्ये कोरोना मृत्यूदर सर्वाधिक 3.15 टक्के आहे. महाराष्ट्र (2.62 टक्के), सिक्कीम (2.09), गुजरात (1.96), पश्‍चिम बंगाल (1.76), पुड्डूचेरी (1.66), मध्यप्रदेश (1.65), उत्तराखंड (1.62), दिल्ली (1.56), छत्तीसगढ (1.58), हिमाचल प्रदेश (1.54), जम्मू-काश्मीर (1.53) तसेच तामिळनाडूचा कोरोना मृत्यूदर  1.51 आहे.

21 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांत दिलासादायक स्थिती 

देशात दर दहा लाख लोकसंख्येमागे 96 कोरोनाबाधित आढळत आहेत. अशात 21 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये दर दहा लाख लोकसंख्येमागे राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत कमी कोरोना रुग्ण आढळत आहेत. यामध्ये छत्तीसगड, त्रिपुरा, पश्‍चिम बंगाल, हरियाणा, मणिपूर, हिमाचल प्रदेश, गुजरात, केरळ, मध्यप्रदेश, तेलंगणा, ओडिशा, उत्तर प्रदेश, मेघालय, अरुणाचल प्रदेश, आसाम, राजस्थान, झारखंड, बिहार तसेच नागालँडचा समावेश आहे. 

हिमाचल, उत्तर प्रदेश, पंजाबसाठी केंद्रीय पथकांची नियुक्ती 

कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आलेख लक्षात घेता केंद्र सरकारने हिमाचल प्रदेश, पंजाब तसेच उत्तर प्रदेशसाठी कोरोना प्रतिसाद आणि व्यवस्थापनात सहाय्य करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णसंख्या वाढत असलेल्या जिल्ह्यांचा दौरा ही तीन सदस्यीय समिती करणार आहे. ही समिती वेळेवर निदान करण्याच्या व्यवस्थापनातील आव्हाने आणि पाठपुरावा यावर कार्यक्षमतेने मार्गदर्शन करेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. शनिवारी उत्तर प्रदेशात 2235, पंजाबमध्ये 672, हिमाचल प्रदेशात 588 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. 

देशातील प्रत्येक पाचवा मृत्यू दिल्लीत 

कोरोनामुळे देशात होत असलेला प्रत्येक पाचवा मृत्यू राजधानी दिल्लीत होत असून, दिल्लीत देशातील एकूण कोरोना मृत्यूंपैकी 20 टक्के मृत्यू होत आहेत. त्यामुळे दिल्लीतील कोरोना स्थिती भविष्यात धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे. गेल्या सहा दिवसांपासून सरासरी 100 जणांचा मृत्यू येथे झाला आहे. देशातील प्रत्येक दहावा रुग्ण दिल्लीत आढळत आहे. दिल्लीतील कोरोनाबळींचा आकडा 8270 झाला आहे. येथे 39 हजार 741 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. 

हिमाचल प्रदेशात पुन्हा सीमाबंदीची शक्यता 

सिमला : हिमाचल प्रदेशात वाढत्या कोरोना संसर्गामुळे पुन्हा राज्याच्या सीमा बंद केल्या जाण्याची शक्यता आहे. सोमवारी होणार्‍या मंत्रिमंडळ बैठकीत असा प्रस्ताव आणला जाऊ शकतो. कोरोना चाचणीनंतर राज्यात प्रवेश दिला जाणार असल्याची चर्चा आहे. सीमेवर पोलिस आणि आरोग्य कर्मचारी तैनात केले जातील. राज्यात गेल्या सात दिवसांत 4800 बाधित आढळले असून, 80 मृत्यू झाले आहेत. संसर्गाचे प्रमाण 1.2 टक्क्यांवरून 1.6 टक्क्यांवर गेले आहे.