Mon, Sep 28, 2020 06:59होमपेज › National › खुशखबर! इजिप्‍त आणि तुर्कीहून कांदा येणार

खुशखबर! इजिप्‍त आणि तुर्कीहून कांदा येणार

Last Updated: Dec 05 2019 8:21PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

कांद्याचा पुरवठा वाढविण्यासाठी सरकारने इजिप्‍तहून ६०९० टन, तर तुर्कीहून ११ हजार टन कांदा मागविला आहे. हा कांदा १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत देशांतर्गत बाजारपेठेत उपलब्ध होईल, अशी माहिती रामविलास पासवान यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

जानेवारीच्या मध्यात आणखी ४ हजार टन कांदा तुर्कीहून मागविला जाणार असून प्रत्येकी पाच-पाच हजार टनाचे तीन टेंडर एमएमटीसीमार्फत काढले जाणार असल्याची माहिती पासवान यांनी दिली. 

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कांद्याचा अपुरा पुरवठा आणि त्यामुळे भडकलेल्या दराच्या अनुषंगाने उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करून संबंधित मंत्रालयांच्या मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर, खाद्यान्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान, रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्यासह अन्य मंत्री व पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. 

कांद्याच्या साठेबाजांवर कारवाई करावी : बंडोपाध्याय

कांद्याचे दर विक्रमी स्तरावर पोहोचल्याच्या पार्श्‍वभूमीवर कांद्याची साठेबाजी केलेल्या व्यापार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे सदस्य सुदीप बंडोपाध्याय यांनी लोकसभेत शून्य प्रहरात केली. कांद्याची साठेबाजी होऊ नये, यादृष्टीने केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना निर्देश द्यावेत, असे सांगून बंडोपाध्याय पुढे म्हणाले की, कांद्याच्या चढ्या दरामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. साठेबाजी रोखण्यासाठी किंमतीवर देखरेख ठेवणार्‍या समितीने अधिक दक्षपणे काम करण्याची आवश्यकता आहे. देशातील बहुतांश ठिकाणी कांद्याचे किलोचे दर शंभर रुपयांच्याही वर गेले आहेत. 

 "