Sat, Aug 08, 2020 11:27होमपेज › National › 'दुबे ठार झाला, मनाला शांती मिळाली'

'दुबे ठार झाला, मनाला शांती मिळाली'

Last Updated: Jul 10 2020 11:50AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

कानपूरमध्ये आठ पोलिसांवर गोळीबार करून त्यांची हत्या करणारा कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा अखेर खात्मा झाला आहे. आज सकाळी पोलिस गाडीला अपघात झाल्यानंतर विकास दुबे पोलिसांकडील शस्त्र हिसकावून पळून जात होता. त्यावेळी त्याला मारण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय नव्हता, असे उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटले आहे. आता जे आठ पोलिस शहीद झाले होते, त्यांच्या कुटुंबियांनी दुबेच्या एन्काऊंटवर काय म्हटले आहे, पाहा. 

विकास दुबेच्या मृत्यूनंतर शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलिस आणि योगी सरकारचे त्यांनी आभार मानले आहेत. आम्हाला न्याय मिळाला, अशा प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या आहेत. शहीद जितेंद्र पाल यांचे वडील म्हणाले, की विकास दुबे मारला गेल्याचे वृत्त मिळाल्यानंतर आम्हाला समाधान वाटले. योगी सरकार आणि उत्तर प्रदेश पोलिस, दोघांचे कौतुक आहे. दोहोंच्या प्रयत्नांमुळे असे शक्य झाले. गुन्हेगार मारला गेल्याचे वृत्त ऐकल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला समाधान मिळाले. विकास दुबेच्या मृत्यूने आमच्या मुलाचे बलिदान व्यर्थ गेले नाही. आमचा मुलगा शहीद झाल्याचा अभिमान आहे. शहीद जितेंद्र पाल यांची आई म्हणाली, विकास दुबे मारला गेला, विकास मारला गेला, हे वृत्त ऐकून मनाला शांती मिळाली. 

औरैया जिल्ह्यातील शहीद झालेले राहुल यांचे वडील म्हणाले, विकास दुबेचा एनकाऊंटर झाल्याने आम्ही आनंदात आहोत. जे झालं ते चांगलं झालं. आम्हाला सरकार आणि पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. हे होणारच होतं. शहीद राहुल यांची बहिण नंदिनी म्हणाली, आज आमच्या भावाचे शांती हवन आहे. आजच्या दिवशी आमचा भाऊ शहीद झाला होता. आजच्या दिवशी तोदेखील मारला गेला. त्यामुळे आमच्या भावाच्या आत्म्याला शांती मिळेल आणि त्याच्यासोबत पकडलेल्या साथीदारांची चौकशी व्हावी आणि त्यांच्याविरोधात कडक कारवाई होवो.