Sat, Feb 27, 2021 05:42
मध्य प्रदेशच्या मंत्र्याचा मास्कला नकार, म्हणे मी होम हवन करते!  

Last Updated: Feb 23 2021 7:39PM

भोपाळ : पुढारी ऑनलाईन

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मध्यप्रदेशही त्याला अपवाद नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मास्क घालणे बंधनकारक केले आहे. जर असे केले नाही तर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्यांच्याच पक्षातील मंत्री असलेल्या उषा ठाकूर आणि बसपाच्या आमदार रामबाई या विनामास्क विधानभवनात आल्या. मंत्री ठाकूर यांनी आपण हनुमान चालिसा वाचते, शंख वाजवते, होमहवन करते त्यामुळे मला कोरोना होणार नाही, असा दावा करत मास्क घालणार नसल्याचे सांगितले. 

वाचा : सांगली महापालिका : जयंत पाटलांनी केला करेक्ट कार्यक्रम

मंगळवारी पर्यटनमंत्री मंत्री उषा ठाकूर या विधानसभेत विनामास्क आल्या. त्यांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, मी हनुमान चालिसा वाचते, रोज शंख वाजवते, गायीच्या शेणापासून बनविलेल्या शेणींचे हवन करते. या बाबी प्रतिकार शक्ती वाढवितात. त्यामुळे मला मास्क घालायची गरज नाही. तर बसपाच्या आमदार रामबाई सिंह याही विनामास्क विधानभवनात आल्या.  मास्क घातल्याने मला अस्वस्थ वाटते त्यामुळे मी घालणार नाही असे सांगितले.

वाचा :  सांगली महापालिका: जयंत पाटलांनी केला चंद्रकांत पाटलांचा दुसऱ्यांदा ‘कार्यक्रम’

या दोन्ही नेत्या ज्यावेळी विधानभवनात आल्या त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशाची आठवण करून दिली. मात्र, मंत्री ठाकूर यांनी मी रोज काढा पिते, हवन करते, शंख वाजवते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कोरोनापासून वाचण्यासाठी गळ्यात ओढणी घालते. कोणी समोर आले तर मी ओढणी तोंडाला लावते. जगात श्रेष्ठ असलेल्या वैदिक पद्धतीने मी जीवन जगते त्यामुळे मला कोणताही त्रास नाही.’ असे सांगत कर्मचाऱ्यांना दाद दिली नाही.

वाचा : पोहरादेवी शक्तीप्रदर्शन; मुख्यमंत्र्यांचे तात्काळ कारवाईचे आदेश

तर आमदार रामबाई म्हणाल्या, मास्क लावला नाही तर दंड होणार असेल तर तो देईन पण मास्क लावणार नाही. मास्क लावल्याने मला अस्वस्थ वाटते. ज्यांच्याजवळ हिंमत असते तेच लोक काहीतरी करू शकतात. 

‘चाट खाल्ल्याने कोरोना वाढतोय’
इंदोर जिल्ह्यातील महू विधानसभा मतदारसंघात सोमवारी १०२ रुग्ण सापडले. येथे कोरोना झपाट्याने वाढत आहे. पर्यटनमंत्री ठाकूर याच मतदारसंघाच्या आमदार आहेत. याबाबत त्यांना विचारले असता, लोक रस्त्यावर चाट, भजी खायला मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळे कोरोना वाढत आहे, असे त्या म्हणाल्या. 

वाचा : विधानसभा अध्यक्षपद : शिवसेनेला हवेत मुरब्बी पृथ्वीराज चव्हाण