Wed, May 19, 2021 05:23होमपेज › National › आधी संविधान तर वाचा!

आधी संविधान तर वाचा!

Last Updated: Nov 22 2020 10:32PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

भारतात सध्या ‘लव्ह जिहाद’विरोधातील कायद्याच्या बातम्या विविध राज्यांतून येत आहेत. मध्य प्रदेशात या कायद्याचा आराखडा तयार केला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा येथेही असा कायदा लागू करण्याची मागणी होत आहे. अशात एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी हे संविधानाच्या आत्म्याच्या विरोधात असून, या लोकांनी आधी संविधान वाचावे, असा सल्ला दिला आहे. 

ओवैसी म्हणाले की, अशा प्रकारचा कायदा संविधानाच्या कलम 14 आणि 21 विरोधात असेल. कायद्याबाबत बोलण्याआधी या लोकांनी संविधान वाचले पाहिजे. द्वेषाचा प्रचार त्यांना उपयोगी पडणार नाही. भाजप युवकांना बेरोजगारीच्या मुद्द्यावरून भरकटवण्यासाठी असे हातखंडे वापरत आहे. ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्यात उत्तर प्रदेशात 10, तर मध्य प्रदेशात पाच वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. 

उत्तर प्रदेशात या प्रस्तावित कायद्याचा मसुदा तयार केला आहे. मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत हा प्रस्ताव येऊ शकतो. बेकायदा धर्मांतर विरोध विधेयक असे याचे नाव आहे, तर मध्य प्रदेशात फ्रीडम ऑफ रिलिजन अ‍ॅक्ट 2020 असे या विधेयकाचे नाव आहे. येथे हिवाळी अधिवेशनात हे विधेयक आणण्यात येणार आहे.