Thu, Nov 26, 2020 21:10होमपेज › National › ‘ड्रॅगन’विरोधात भारताचे ‘टनेल डिफेन्स’

‘ड्रॅगन’विरोधात भारताचे ‘टनेल डिफेन्स’

Last Updated: Nov 23 2020 2:06AM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारत आणि चीनदरम्यान चर्चेच्या फेर्‍या सुरू आहेत. मात्र, तणाव अद्याप निवळलेला नाही. चीनकडून अनेकदा बारीकसारीक कुरापती सुरू असतात. भारताबरोबर शांततापूर्ण संबंध राखण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा चीन करीत असला, तरी तो गुपचूप कारवाया करीत भारतभूमीवर हात-पाय पसरायचा प्रयत्न करत असतो. चीनला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची भारतानेही सज्जता केली असून, लष्कराने लडाखमध्ये ‘टनेल डिफेन्स’ची तयारी केली आहे.

चीनने दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जपानविरोधात लढताना ही युक्ती वापरली होती. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने ल्हासा तळावर एअरक्राफ्ट तैनात करण्यासाठी बोगदे तयार केले आहेत. शिवाय, दक्षिण चीन सागरात आण्विक क्षेपणास्त्रांनी सज्ज पाणबुड्या ठेवण्यासाठी हैनान प्रांतात जमिनीखाली जय्यत तयारी केली आहे.

या पार्श्वभूमीवर भारतानेही सज्जता ठेवली आहे. लडाखमध्ये बोगदे खणले आहेत. त्यामध्ये प्रचंड व्यासाचे काँक्रीट पाईप बसवले आहेत. शत्रूकडून हल्ला झाल्यास या ठिकाणी सुरक्षित राहून प्रतिहल्लाही चढवता येईल, अशी ही व्यवस्था असल्याचे सूत्रांनी सांगितले. एका हिंदी  दैनिकाने हे वृत्त दिले आहे.

बोगद्यात टाकलेले हे पाईप्स 6 ते 8 फूट व्यासाचे आहेत. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी सहज जाता येईल, अशा पद्धतीने या बोगद्यांची रचना आहे. शत्रुपक्षाकडून होणार्‍या हल्ल्यावेळी सुरक्षित राहण्याबरोबरच त्यांच्यावर गनिमी काव्याने हल्लाही करता येणे यामुळे शक्य होणार आहे. या पाईप गरम करण्याचीही व्यवस्था आहे.  कडाक्याची थंडी आणि बर्फाच्या वादळापासून बचाव करण्यासाठी या बोगद्यांचा फायदा होणार आहे. भारत आणि चिनी सैन्य यंदा दोनदा भिडले आहे. गलवान प्रांतात घडलेल्या या घटनेनंतर दोन्ही देशांदरम्यान बोलणी सुरू झाली आहेत. त्याचवेळी सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्येही चीनकडून आक्रमक धोरण राबवले जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सेनेनेही सर्व शक्यता गृहीत धरून सज्जता ठेवली आहे. ‘टनेल डिफेन्स’ही याच नीतीचा भाग समजला जातो.