नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
सर्वसामान्यांना माफक दरात औषधी उपलब्ध करवून देण्याकरिता देशभरात ७ हजार ६४ प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. कोरोना काळात चालू आर्थिक वर्षात या केंद्रांतून ४८४ कोटी रुपयांच्या गुणवत्तापूर्ण जेनरिक औषधांची विक्री करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत ६० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली . सर्वसामान्य नागरिकांची त्यामुळे ३ हजार कोटींची बचत झाल्याचा दावा केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी गुरुवारी (दि.१४)केला.
सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने जन औषधी केंद्रासाठी ३५.५१ कोटींचा निधी दिला होता. नागरिकांची २ हजार ६०० कोटींची बचत झाली. सरकारने खर्च केलेल्या दर एका रुपयामागे नागरिकांचे प्रत्येकी ७४ रुपये वाचले, असेही गौडा म्हणाले