Thu, Jan 28, 2021 04:22
शेतकरी आंदोलनाला ५० दिवस पूर्ण ! आंदोलन अधिक तीव्र करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार 

Last Updated: Jan 14 2021 7:21PM
नवी दिल्ली  : पुढारी वृत्तसेवा

शेतकरी आंदोलनाने गुरुवारी अर्धशतक गाठले. दिल्लीच्या विविध सीमांवर आजही विविध राज्यातील शेतकरी ठाण मांडून आहेत.तिन्ही शेती सुधारणा कायदे जोपर्यंत केंद्र सरकार मागे घेत नाही तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा मानस शेतकऱ्यांचा आहे. या वर्षीचा प्रजासत्ताक दिवस ऐतिहासिक राहील असा दावा शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी केला. विशेष म्हणजे ५० व्या दिवशी शेतकऱ्यांनी आंदोलन देशव्यापी करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अभी नही तो कभी नही’ ही शेतकऱ्यांची भूमिका आहे.

पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, राजस्थाननंतर अन्य राज्यांतील शेतकरी सामील झाल्याने या चळवळीने देशव्यापी स्वरूप धारण केले आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द करावे आणि एमएसपीला कायदेशीर अधिकार द्यावेत या मागण्यांवर शेतकरी ठाम आहेत. तीन कृषी कायद्यांची प्रत जाळून लोहरीचा सण साजरा करण्यात आला आहे. सिंघू सीमेवरील सर्व शेतकरी नेत्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन दुल्ला भट्टी यांचे स्मरण करून सरकारला आव्हान दिले,असे शेतकरी नेते डॉ.दर्शन पाल म्हणाले.