Wed, Jun 23, 2021 02:51
पद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे कोरोनाने निधन

Last Updated: May 18 2021 4:11PM

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल यांचे कोरोना संसर्गाने सोमवारी रात्री निधन झाले. निष्णात हृदयरोग तज्ञ अशी ओळख असलेले डॉ. अग्रवाल सामाजिक क्षेत्रातही कार्यरत होते. आरोग्य क्षेत्रातील कामगिरीसाठी २०१० साली केंद्र सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता.

दिल्लीच्या खेलगाव भागात राहणारे डॉ. अग्रवाल हार्ट केअर फाऊंडेशनचे अध्यक्ष होते. कोरोनाचे निदान झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरु होते. प्रकृती बिघडल्यामुळे तीन दिवसांपूर्वी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मावळली.

विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी डॉ. अग्रवाल यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. परंतु गेल्या महिन्यात त्यांना संसर्ग झाला होता. आपल्याला कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती त्यांनी 28 एप्रिल रोजी सोशल मीडियावरून दिली होती. डॉक्टरी पेशेत असूनही त्यांनी हजारो गरीब व दुर्बल घटकातील रूग्णांवर मोफत उपचार केले होते. कोरोना संसर्ग झालेला असतानादेखील ते रुग्णांना ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन करीत होते.