Sat, Aug 08, 2020 14:58होमपेज › National › रतन लाल यांना मिळणार 'शहिद दर्जा', राज्य सरकारकडून १ कोटींची मदत

रतन लाल यांना मिळणार 'शहिद दर्जा', राज्य सरकारकडून १ कोटींची मदत

Last Updated: Feb 26 2020 7:52PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

राजधानीतील गोकुलपूरीत हिंसाचारादरम्यान गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या रतन लाल यांच्या कुटुंबियांना दिल्ली सरकारने बुधवारी १ कोटींची मदत जाहीर केली. परिवारातील एका सदस्याला नोकरी देण्याचे आश्वासनही राज्य सरकारकडून देण्यात आले आहे. विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंबंधीची घोषणा केली. केंद्र सरकारनेही रतनलाल यांच्या कुटुंबियांना १ कोटींची मदत तसेच एका सदस्याला नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी यासंबंधी माहिती दिली. रतन लाल यांना 'शहिद' दर्जा देण्यात येणार असल्याचेही नड्डा यांनी स्पष्ट केले. 

शहिद दर्जा देण्याची मागणी करीत रतन लाल यांच्या कुटुंबियांनी घोषणाबाजी केली होती. आयबीचे पोलीस कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्येमागे राजकीय षडयंत्र असल्याचा संशय भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी व्यक्त केला. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. हिसांचारात आतापर्यंत २४ जनांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुरु तेज बहादूर रूग्णालयात २२, तर एलएनजेपी रूग्णालयात दोघांचा मृत्यू झाल्या. तिघांची स्थिती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय अधिका-यांकडून देण्यात आली आहे. मौजपूर तसेच इतर हिंसाचाग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार  अजित डोवाल यांनी केंद्रीय गृ​हमंत्री अमित शहांची भेट घेतली. बैठकीत आयबीचे प्रमुख तसेच गृह​ सचिव उपस्थित होते.

हिंसाचारप्रभावित भागातील परीक्षा रद्द 

हिंसाचार प्रभावित उत्तर-पूर्व तसेच पूर्व दिल्लीतील परिक्षाकेंद्रावर उद्या, गुरुवारी इयत्ता १२ वीची इंग्रजी विषयाची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. जवळपास ८० परीक्षा केंद्रावरील परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने (सीबीएसई)​ दिली आहे. पूर्व दिल्लीतील ७ परीक्षा केंद्राचा त्यात समावेश आहे. परीक्षेची नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

१०६ जणांना अटक 

हिंसाचार करणा-या जवळपास १०६ जणांना आतपर्यंत अटक करण्यात आली असून १८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ड्रोनच्या सहाय्याने परिसरावर पाळत ठेपवली जात आहे. नागरिकांच्या मदतीसाठी ११२ क्रमांकासह इतर दोन क्रमांक जाहीर करण्यात आले, अशी माहिती पोलीस दलाच्या जनसंपर्क अधिका-याकडून देण्यात आली आहे.