नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
संसद भवनच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू झाले असून, ते 2022 पर्यंत पूर्ण होईल. भारताच्या स्वातंत्र्याला 2022 मध्ये 75 वर्षे पूर्ण होणार असून, या पार्श्वभूमीवर नवीन इमारतीत संसदीय कामकाज सुरू होईल, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शनिवार पत्रकार परिषदेत सांगितले.
बिर्ला म्हणाले की, लवकरच शिलान्यास कार्यक्रमही आयोजित केला जाईल. या बांधकामाचा आगामी संसदीय अधिवेशनावर कोणताही परिणाम होणार नाही. खासदारांच्या नवीन 76 निवासस्थानांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. या घरांचे बांधकाम पूर्ण करण्यास 27 महिन्यांचा कालावधी लागला. या प्रकल्पाची एकूण किंमत 188 कोटी रुपये होती, त्याच किमतीमध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला. गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या नावावरून विश्वंभर दास मार्गावर वसलेल्या या घरांना नावे दिली आहेत.
25, 26 रोजी पीठासन अधिकारी परिषद
येत्या 25 व 26 नोव्हेंबर रोजी गुजरात येथे पीठासन अधिकारी परिषद आयोजित केली आहे. तिचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी आणि राज्यपाल आचार्य देवव्रत उपस्थित राहणार आहेत. 26 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमास व्हर्च्युअल पद्धतीने संबोधित करतील.