Sat, Feb 27, 2021 06:39
ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरण : कोर्टात बोलताना २१ वर्षीय दिशा रवीला का अश्रू अनावर झाले!

Last Updated: Feb 15 2021 10:46AM

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. मात्र, ग्रेटाच्या एका ट्विटमुळे मोठा वाद झाला. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ग्रेटाने 'टूलकिट' शेअर केले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कारवाई करत बंगळूर येथील २१ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीला शनिवारी अटक केली. दिशाला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तिला दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात हजर केलं. तिथे तिला न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली. 

वाचा : श्रीलंका आणि नेपाळमध्येही अमित शहा भाजपचे सरकार आणणार; बिप्लब देव यांचा दावा

टूलकिट एडिट करुन त्यात बदल केल्याचा तिच्यावर आरोप आहे. तिला जेव्हा न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा तिला अश्रू आवरता आले नाहीत. आपण के‍वळ दोन ओळी एडिट केल्या होत्या आणि मला शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यायचा होता, असे दिशाने न्यायालसमोर सांगितले. 

दरम्यान, पोलिसांचे म्हणणे आहे की एडिटिंग अनेकवेळा करण्यात आले आहे. ३ फेब्रुवारी रोजी दिशाने कथितरित्या टूलकिट एडिट केले आणि या प्रकरणात अन्य काहीजणांचा सहभाग आहे. तर याआधी दिल्ली पोलिसांनी गुगल आणि सोशल मीडिया कंपन्यांना टूलकिट बनविण्याऱ्यांशी संबंधित ईमेल आयडी, डोमेन यूआरएल आणि काही सोशल मीडिया अकाउंटची माहिती देण्यास सांगितले आहे. 

वाचा : माजी सरन्यायाधीश गोगाईंचे वक्तव्य धक्कादायक; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

टूलकिट एडिटिंग करुन ते व्हायरल केल्याचा आरोप पोलिसांनी दिशावर ठेवला आहे. दरम्यान, दिशा रवीची तत्काळ सुटका करण्याची मागणी संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) केली आहे.  

ग्रेटाने जे टूलकिट शेअर केले होते त्यात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले होते. ग्रेटाने शेअर केलेल्या टूलकिटमध्ये ‘Will you be part of the largest protest in human history?’ असा मजकूर होता. मात्र, तिने हे ट्विट नंतर डिलीट केले.

वाचा : ८८ टक्के लोकांना वाटतं की, तंबाखू नियंत्रण कायदा आणखी कठाेर व्हावा!