Wed, Jun 23, 2021 02:50
कोरोना बळींचा आकडा अचानक कसा फुगला?

Last Updated: Jun 11 2021 2:41AM

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला मे महिन्यापासून देशभर ओहोटी लागली आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्या हजारोंनी कमी होत असताना गुरुवारी अचानक कोरोना मृत्यू संख्येने उसळी घेतली. 24 तासांत देशातील 6,148 बाधितांचा  मृत्यू झाल्याची नोंद झाल्याने देशवासीयांसह आरोग्य यंत्रणेचेही डोळे पांढरे होण्याची वेळ आली. मात्र, हा कोरोना मृत्यूचा कहर नसून, आजवर नोंदवले न गेलेले मृत्यू बिहारने अचानक अपडेट केल्याने हा आकडा फुगला. बिहारने 3951 मृत्यूंची नोंद केली. हे सर्व मृत्यू कोणत्या काळातील आहेत हे स्पष्ट नाही. परंतु कोरोना मृत्यूंची आकडेवारी अपडेट करण्याची ही पद्धत महाराष्ट्रासारखे राज्यही दर महिन्याच्या शेवटी करते.

कोरोना आल्यापासून बिहारने ही डाटा क्‍लिनिंग पद्धत प्रथमच वापरली. मृत्यूचे हे आकडे अवघ्या 24 तासांतील नाहीत. मात्र, त्याची नोंद एकाच दिवसात घेण्यात आली.  बिहारच्या या मृतांमध्ये अनेक बळी गतवर्षीचेदेखील असू शकतात. मृत्यूच्या आकड्यांचे समायोजन बिहारने एकाच दिवशी केल्यामुळे ही खळबळ उडाली. विशेष म्हणजे सर्वाधिक कोरोना बळी नोंदवणार्‍या दहा राज्यांमध्ये बिहारचा समावेश नाही. या यादीत महाराष्ट्र, 104712 बळींसह पहिल्या क्रमांकावर आहे.