Wed, May 19, 2021 05:05
यंदा देशात सुरू होणार ५-जी सेवा

Last Updated: May 04 2021 11:19PM

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

नव्या जमान्याची 5-जी कम्युनिकेशन सेवा चालू वर्षातच देशात सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. केंद्र सरकारने देशात 5-जी  चाचणीसाठी 13 निविदांना मंजुरी दिली आहे. या चाचणीत ‘हुवावे’ आणि ‘झेडटीई’सारख्या चिनी कंपन्यांना मज्जाव करण्यात आलेला आहे, हे विशेष! 

चाचणीसाठी एकूण 16 निविदा सरकारला प्राप्‍त झाल्या होत्या. केंद्रीय दूरसंचार कंपनीने ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमेटिक्स’सोबत भागीदारी केली असून, ते केंद्र सरकारचेच दूरसंचार तंत्रज्ञान विकास केंद्र आहे. ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमेटिक्स’ची स्थापना 1984 मध्ये करण्यात आली होती. भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि रिलायन्स जिओने एरिक्सन आणि नोकियाशी व्हेंडर्ससह भागीदारी केली आहे. सर्वच दूरसंचार विभागांसाठी वेगवेगळ्या व्हेंडर्ससह ही भागीदारी आहे, असे एका अधिकार्‍याने सांगितले.

5-जी चाचणीसाठी टेलिकॉम कंपन्यांना लवकरच 700 मेगाहर्टझ् बँडची एअरवेव्ह उपलब्ध करून दिली जाईल. काही अटीही त्यात असतील. टेस्टिंगसारख्या अटींचे पालन कंपन्यांना करावे लागेल. नेटवर्क सुरक्षिततेवर भर द्यावा लागेल, अशा स्वरूपाच्या या अटी आहेत. 

2021 च्या दुसर्‍या सहामाहीत रिलायन्स जिओचे 5-जी लाँचिंग?

सन 2020 मध्ये झालेल्या भारतीय मोबाईल अधिवेशनात रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी, रिलायन्स जिओ 2021 च्या दुसर्‍या सहामाहीत 5-जी लाँच करण्याची  योजना आखत असल्याचे सांगितले होते. 

श्रीलंकेसह 68 देशांत 5-जी सेवा

दक्षिण कोरिया, चीन आणि अमेरिकेत सर्वात आधी 5-जी सेवा सुरू झाली. नंतर श्रीलंका, ओमान, फिलिपाईन्स, न्यूझीलंडसारख्या लहान-सहान मिळून 68 देशांत ही सेवा सुरू आहे.