Wed, May 19, 2021 04:18
देशभरात लसीकरण महोत्‍सवाला प्रारंभ, पंतप्रधानाचे देशवासियांना आवाहन 

Last Updated: Apr 11 2021 4:15PM

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशभरात कोरोना रुग्‍णवाढीचा विस्‍फोट सुरुच राहिला आहे. वाढत्‍या रुग्‍णसंख्‍येवर नियंत्रण आणण्‍यासाठी कोरोना प्रतिबंधित लस हाच एकमेव उपाय आहे. लसीकरण मोहिम आणखी व्‍यापक व्‍हावी,जास्‍तीत-जास्‍त नागरिकांनी लस घ्‍यावी, या उद्‍देशाने देशभरात ११ ते १४ एप्रिल या कालावधीत लसीकरण महोत्‍सवाचे (टीका उत्‍सव) आयोजन करण्‍यात आले आहे. 

या उपक्रमाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्‍हटलं आहे की, आज थोर समाजसुधारक महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांच्‍या जयंतीनिमित्त ११ एप्रिलपासून देशभरात लस महोत्‍सवाला (टीका उत्‍सव) प्रारंभ होत  आहे. हा महोत्‍सव भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंतीपर्यंत सुरु राहणार आहे. ही मोहिम कोरोना विरोधातील दुसरी सर्वात मोठी लढाई आहे. 

वाचा : देशात दीड लाखांहून अधिक नवे रुग्‍ण, ८३९ जणांचा मृत्‍यू

कोरोना रुग्‍णसंख्‍या वाढत आहे. यामुळे नागरिकांनी चार गोष्‍टींचे आवर्जून पालन करावे. सर्वप्रथम नागरिकांनी कोरोना प्रतिबंधित लस घ्‍यावी. निरक्षर नागरिकांना व जे स्‍वत: जावून लस घेवू शकत नाहीत, अशा ज्‍येष्‍ठ नागरिकांना लस घेण्‍यासाठी मदत करावी. प्रत्‍येकाने स्‍वत: मास्‍कचा वापर करावा, त्‍याचबरोबर दुसर्‍यांनीही मास्‍कचा वापर करण्‍यासाठी आग्रही राहवे. रुग्‍ण पॉझिटीव्‍ह आढळलेल्‍या ठिकाणी नागरिकांनी स्‍वत: पुढाकार घेवून मायक्रो कंन्‍टेमेंट झोन करावेत, असे आवाहनही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केले. .  

वाचा : 'महाराष्ट्राला सर्वाधिक लसपुरवठा'