Wed, Jun 23, 2021 00:50
पुढील साडेतीन वर्षेही ठाकरेच मुख्यमंत्री : संजय राऊत

Last Updated: Jun 11 2021 8:49PM

जळगांव; पुढारी वृत्तसेवा : पुढची साडेतीन वर्षेही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी आठवलेंना टोला लगावला. संज राऊत यांनी  'महाविकास आघाडीच्या सरकारने दीड वर्ष पूर्ण केले आहेत. येणारी साडेतीन वर्षेही महाविकास आघाडीचे सरकार राज्यात राहणार आहे. तसेच मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच राहतील असे वक्तव्य केले.  जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले. 

रामदास आठवले यांनी नागपुरात बोलताना 'उध्दव ठाकरे यांना राज्यात मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊन दिड वर्ष पूर्ण होत आले आहे. आणखी एक वर्ष त्यांनी मुख्यमंत्री पदावर राहावे आणि पुढची अडीच वर्ष भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर बसू द्यावे.' असे वक्तव्य केले होते.

उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज चोपडा येथे जळगाव लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की 'राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच राहणार आहे.  पुढील तीन वर्षे राज्यात तीन पक्षांचे सरकार राहणार. राज्यात ठरल्या वेळीच निवडणुका होणार असे म्हणाले. राष्ट्रवादी शिवसेना एकत्र लढणार असे शरद पवार म्हणाले. असा प्रश्न विचारला असता म्हणाले की ते बरोबर बोलत आहेत जे ठरले आहे तेच बोलत आहेत. पवार साहेब वरिष्ठ मार्गदर्शक आहे.'

पंतप्रधान व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर शिवसेना नरमली हा प्रश्न उपस्थित केला असता, खासदार संजय राऊत म्हणाले की 'कधी वाघ म्हणतात, कधी नरमले म्हणतात. हे शब्द सोडून द्यावे.' असा सल्ला त्यांनी टीका करणाऱ्यांना दिला.

ते पुढे म्हणाले की, केंद्राच्या अखत्यारीत  येणारे काही प्रश्न असतात. त्यासाठी कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री हे पंतप्रधानांना भेटू शकतात.  राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी ही भेट होती. मुख्यमंत्री ठाकरे नियमित संयमाची भूमिका घेत असतात.'