Wed, Jun 23, 2021 02:15
जळगाव : इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करून तरूणीची बदनामी

Last Updated: Jun 04 2021 2:34PM

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : योगेश्वर नगरात राहणाऱ्या तरूणीच्या नावाने इन्स्टाग्राम वर बनावट अकाऊंट तयार करण्यात आले होते. या अकाऊंटचा वापर तरूणीची बदनामी करण्यासाठी झाला असल्याचे गुरूवारी सायंकाळी उघडकीस आले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर सायबर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की,  योगेश्वर नगरात २३ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह राहते. २६ मे ते ३ जून २०२१ दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या नावाचा वापर करून इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार केले. या खात्यावर या तरूणीचा फोटो अपलोड केला. त्यानंतर तरूणीचे इन्स्टाग्रामवरील अकाऊंट खरे भासवून त्यांच्या मित्र व मैत्रिणींशी विचीत्र पध्दतीने चॅटिंग सुरू केले. 

हा प्रकार तरूणीला ३ जून रोजी गुरूवारी दुपारी समजला. त्यांनी तातडीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. बनावट अकाऊंट तयार करून बदनामी केल्याप्रकरणी तरूणीच्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे.