Mon, Sep 28, 2020 08:27होमपेज › Nashik › भाजप जिल्हाध्यक्ष निवडीवेळी महाजन, दानवेंसमोरच राडा

भाजप जिल्हाध्यक्ष निवडीवेळी महाजन, दानवेंसमोरच राडा

Last Updated: Jan 11 2020 2:02AM
जळगाव : प्रतिनिधी
येथील भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिल्हा सरचिटणीस व भुसावळ नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक सुनील नेवे यांच्या तोंडाला शाई फासत मारहाण करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. 10) घडला. यामुळे जिल्ह्यातील भाजप अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठक सुरू होण्यापूर्वीपासूनच भुसावळचे    कार्यकर्ते आक्रमक पवित्र्यात होते. भुसावळ शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष पदावरून आधी वाद झाला होता. त्यातच ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू होती. निवडणुकीची जबाबदारी ना. दानवे यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांच्यासमवेत सहायक निवडणूक अधिकारी म्हणून डॉ. विजय धांडे, आमदार सुजितसिंग ठाकूर, माजी मंत्री गिरीश महाजनही होते. 

निवडणूक प्रक्रिया सुरू होताच भुसावळ येथील भाजप कार्यकर्त्यांनी मंचाजवळ जात भुसावळ शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या निवडीवर आक्षेप घेतला व दानवे, महाजन यांना घेराव घातला. काही कार्यकर्त्यांनी मंचावर असलेले नगरसेवक सुनील नेवे यांच्या चेहर्‍यावर व अंगावर शाई टाकली. ना. दानवे, महाजन, ठाकूर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या अंगावरही शाई उडाली. यानंतर महाजन यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष दिसून आला. मात्र, महाजन यांनी सर्वांना शांत केले. या प्रकारामुळे ना. दानवे व आ. ठाकूर यांना कपडे बदलण्यासाठी परत जावे लागले. दुपारी 3  वाजता ते पुन्हा बैठकस्थळी आले व ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार हरिभाऊ जावळे यांच्या नावाची घोषणा केली. 

आधी गैरसमज
जिल्हाध्यक्ष निवडणूक बैठकीत  एकच गोंधळ झाल्याने आधी  रावसाहेब दानवे व माजी मंत्री गिरीश महाजन यांचेच कार्यकर्ते आपसात भिडल्याचा अनेकांना गैरसमज झाला. मात्र, काही वेळानंतर खरा प्रकार सर्वांच्या लक्षात आला.

 "