Sun, Sep 20, 2020 09:01होमपेज › Nashik › धुळ्यात जमावबंदी, वादग्रस्त ट्विटमुळे एकावर गुन्हा

धुळ्यात जमावबंदी, वादग्रस्त ट्विटमुळे एकावर गुन्हा

Last Updated: Nov 09 2019 12:54PM
धुळे : प्रतिनिधी 

अयोध्या येथील राम मंदिराच्या निकालानंतर कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी धुळे येथील जिल्हा प्रशासनाने जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान फेसबुकवरून वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणात धुळ्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळ्यात अयोध्येच्या निकालानंतर तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने संवेदनशील भागांमध्ये बंदोबस्त वाढवला आहे. तसेच या भागात पोलिसांची गस्त देखील वाढवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याभरामध्ये जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्याचप्रमाणे या कालावधीमध्ये सोशल मीडिया वरून देखील कोणताही वादग्रस्त संदेश देण्यास मनाई करण्यात आली आहे .असा वादग्रस्त संदेश देणाऱ्या वर कठोर कारवाई केली जात आहे. याच संदर्भात फेसबुकवरून वादग्रस्त संदेश दिल्या प्रकरणात संजय रामेश्वर शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

दरम्यान पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉक्टर राजू भुजबळ आणि जिल्हाधिकारी गंगाधरण यांनी जनतेला शांतता राहण्याचे आवाहन केले आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालाचा प्रत्येकाने स्वीकार करून शहरांमध्ये शांततेचे वातावरण ठेवावे तसेच तणाव निर्माण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची माहिती तातडीने प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

 "