Mon, Jan 18, 2021 20:00
जळगाव : 'ओएलएक्‍स'वर दुचाकी घेणाऱ्या तरूणाला ५८ हजार रूपयांचा ऑनलाईन गंडा

Last Updated: Jan 14 2021 6:39PM

संग्रहित छायाचित्रजळगाव : पुढारी ऑनलाईन 

'ओएलएक्‍स'वरून दुचाकी घेण्याचे आमिष दाखवत पेटीएमच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीने जळगावात एका तरूणाला ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार बुधवारी (दि. १३) सायंकाळी उघडकीस आला आहे. (Online fraud of Rs 58,000 on OLX in Jalgaon) ही घटना येथील शनीपेठ हद्दीतील हरीओम नगरात घडली असून तरूणाची ५८ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. योगेश विठ्ठल तायडे (वय-२२ रा. हरीओम नगर, शनीपेठ) असे फसवनूक झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा : जळगाव : पैलवानाला आत्महत्येस प्रवृत्त केले; गुन्हा दाखल

अधिक माहिती अशी की, योगेश विठ्ठल तायडे हा तरूण आपल्या आईवडील व भाऊसोबत हरीओम नगर, शनीपेठ येथे राहतो. शहरातील एका मेडीकलमध्ये नोकरी करत आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. मेडीकलमध्ये काम करत असल्यामुळे त्याला दुचाकीची आवश्यकता होती. त्यामुळे त्याने ओएलक्सवर दुचाकी शोधण्याचे काम सुरू होते. ११ जानेवारी रोजी ओएलक्सवर एक दुचाकी आवडली व दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधला. दुचाकीचे कागदपत्र व्हॉट्स ॲपवर मागावली. त्या अनोळखी व्यक्तीने पाठविलेले कागदपत्रे पाहून योगशचा विश्वास बसला. त्यावरून त्याने दुचाकीची किंमत २२ हजार रूपयांना ठरवली. तसेच तत्काळ २ हजार १५० रूपये पेटीएमने पाठविले. 

वाचा : जळगाव : फ्रॅंचायजीच्या नावाखाली दाम्पत्याला फसविले

दरम्यान त्या अज्ञात व्यक्तीने मी इंडियन आर्मी पोस्ट ऑफिस मधून बोलत असल्याची बतावणी करून पैसे पाठविल्याशिवाय गाडी मिळणार नाही असे सांगितले. यानंतर योगशने ५ हजार रूपये दोन वेळा, ९ हजार १५० दुसऱ्यांदा, ९ हजार १०० तिसऱ्यांदा पाठविले. त्यानंतरही त्या अज्ञात व्यक्तीने गाडी मिळाली नाही अशी री लावली. यानंतर पुन्हा योगशला त्या अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि ११ हजार ९९९ रूपयांची मागणी केली. ही रक्कम मिळताच गाडी मिळून जाईल असे त्याने सांगितले. 

वाचा : नाशिकच्या उमरणेत सरपंचांसाठी लागली तब्बल २ कोटींची बोली, आयोगाकडून निवडणूकच रद्द  

दरम्यान आपली फसवणूक होत असल्याचे योगेशच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने तातडीन शनीपेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. योगेश तायडेच्या फिर्यादीवरून ५८ हजार ३७३ रूपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे करत आहे.