Thu, Oct 01, 2020 18:12होमपेज › Nashik › प्रेमीयुगुलाची आत्महत्या

प्रेमीयुगुलाची आत्महत्या

Published On: Jan 21 2019 1:35AM | Last Updated: Jan 20 2019 11:27PM
डांगसौंदाणे : वार्ताहर

बागलाण तालुक्यातील पठावे दिगर येथे विवाहित प्रेमीयुगुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील पठावे दिगर येथील विवाहित तरुण बाळू मधुकर टोपले (30) व चाफ्याचा पाडा, आलियाबाद) येथील विवाहिता आशाबाई पोपट चौरे (29) या प्रेमीयुगुलांनी मध्यरात्री पठावे दिगर येथील सावरपाडा शिवारातील पंडित टोपले यांच्या मालकीच्या गट नंबर 61 मधील आंब्याच्या झाडाला एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.

बाळू टोपले हा सोग्रस (ता. चांदवड) येथे पोल्ट्री शेडवर सपत्नीक कामाला होता. तर याच शेडवर आलीयाबाद येथील चाफ्याचा पाडा येथील आशाबाई चौरे व पोपट चौरे हे दाम्पत्य कामास होते. या दरम्यान आशाबाई व बाळू यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. काही दिवसांपूर्वी आशाबाई व तिचा पती गावी नवीन घराचे बांधकाम करण्यासाठी आले होते.

तर तीन दिवसांपूर्वी बाळू टोपले हा पठावे येथे आजी मयत झाल्याने आपल्या मूळ गावी आलेला होता. तेव्हापासून आशाबाई ही आपल्या गावातून बेपत्ता असल्याचे नातलगांनी सांगितले. सकाळी दोघेही पठावे येथील सावरपाडा येथे आंब्याच्या झाडाला गळफास घेतल्याचे आढळून आल्याची माहिती पोलीसपाटील तुकाराम बहिरम यांनी सटाणा पोलिसांना दिली. प्रभारी पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी जात दोघांचे मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी सटाणा ग्रामीण  रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, सटाणा पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, पोलीस हवालदार राजेंद्र भामरे, साहेबराव गायकवाड, पंकज सोनवणे तपास करीत आहेत.

कर्मचारीच नाही

डांगसौंदाणे येथील ग्रामीण रुग्णालय अपुर्‍या सोयी-सुविधांमुळे शोभेची वास्तू ठरते आहे. आजच्या या प्रेमीयुगुलाला येथे उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले असता येथे पोस्टमार्टम कर्मचारी नसल्याने सटाणा येथे नेण्याचे वैद्यकीय अधिकार्‍याने सांगितल्याने मृतांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्‍त केली.