Sat, Aug 08, 2020 14:41होमपेज › Nashik › मनमाड शहराचा पाणीप्रश्‍न सुटणार

मनमाड शहराचा पाणीप्रश्‍न सुटणार

Published On: Jun 13 2019 1:35AM | Last Updated: Jun 13 2019 1:35AM
मनमाड : वार्ताहर

मनमाड शहरासाठी बहुचर्चित व बहुप्रतीक्षित असलेल्या करंजवण पाणीपुरवठा योजनेला अखेर बुधवारी (दि.12) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत हिरवा कंदील दिला. या योजनेमुळे मनमाडचा पाणीप्रश्‍न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

मनमाड शहराची पाणी समस्या कायमस्वरूपी सुटावी, यासाठी शासन दरबारी करंजवण पाणी योजनेसाठी पाठपुरावा सुरू होता. काही कारणास्तव ही योजना रखडली होती. या योजनेला मंजुरी द्यावी, यासाठी नगराध्यक्षा, लोकप्रतिनिधी, पालिका प्रशासन, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, मनमाड बचाव समिती सतत प्रयत्न करीत होते. गेल्या आठवड्यात पाच तरुणांनी यासाठी उपोषणही केले. जिल्हा परिषदेच्या सभापती मनीषा पवार यांनीदेखील पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. अखेर या योजनेवर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी मुंबईला त्यांच्या दालनात बैठक घेतली. त्यात योजनेवर चर्चा झाली. त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. भारती पवार, जिल्हा परिषद सभापती मनीषा पवार, आमदार पंकज भुजबळ, नगराध्यक्षा पद्मावती धात्रक, गटनेते गणेश धात्रक, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांच्यासह वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ना. महाजन, खासदार डॉ. पवार व इतरांनी करंजवण योजना मनमाडसाठी किती योग्य आहे हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करंजवण योजनेला तत्काळ मंजुरी देऊन विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याअगोदर या योजनेच्या कामाला सुरुवात होईल, असे आश्‍वासन दिले.

दरम्यान, योजना मंजूर झाल्याचे वृत्त येताच भाजपा-शिवसेना, आरपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह इतर राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व नागरिकांनी फटाके फोडून जल्लोष केला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या योजनेसाठी ठाम भूमिका घेतली होती. करंजवण योजना ही मनमाडसाठी वरदान ठरणार असून, या योजनेमुळे सव्वालाख नागरिकांची पाणीटंचाईतून कायमस्वरूपी सुटका तर होणारच आहे. शिवाय शहराच्या खुंटलेल्या विकासालाही चालना मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याअगोदर या योजनेच्या कामाला सुरुवात होईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

45 कोटी रुपये भरावे लागणार

तब्बल 297 कोटी रुपयांची ही योजना असून, त्यासाठी 15 टक्के अर्थात 45 कोटी रुपये लोकवर्गणी पालिकेला भरावी लागणार आहे. मात्र, पालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता 45 कोटी रुपये एकाच वेळी न भरता त्याचे हप्ते करून देण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या योजनेचे पाणी रेल्वेलाही मिळणार असल्याने रेल्वे प्रशासनाबरोबर मनमाडमधील ऑइल कंपन्यांकडून मदत घेऊ, त्यासाठी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी आपण स्वत: बोलू, असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.