Wed, May 19, 2021 05:42
धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर कांद्याचा ट्रक उलटताच नागरिकांची झुंबड; अवघ्या अर्ध्या तासात ३० टन कांदा गायब

Last Updated: May 03 2021 6:35PM

धुळे : पुढारी वृत्तसेवा

मुंबई-आग्रा महामार्गावरील पुलावरुन कांद्याचा ट्रक उलटुन अपघात झाल्याने चालक व क्लिनर जखमी झाले. यावेळी कांद्याचा ट्रक उलटल्याने कांदा रस्त्यावर विखूरला गेला. याची माहिती आजूबाजूला पसरताच बघ्यांसह नागरिकांची झुंबड उडाली. इतकचं काय लोकांनी कांद्याबरोबरच ताडपत्री व दोरखंड देखिल लांबवला. याप्रकरणात शिरपुर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अधिक वाचा : नाशिक : पिस्तूलाचा धाक दाखवून चौघांच्या टोळीकडून जबरी लूट

याप्रकरणी शिरपुर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथील कांदा कानपुर येथे पाठविण्यासाठी ट्रक भरण्यात आला होता. हा ट्रक पोहोच करण्यासाठी चालक राजेश रावत यांनी मुंबई-आग्रा महामार्ग निवडला. हा ट्रक तापी नदीवर असलेल्या पुलाच्या शिरपुरकडील भागाजवळ पोहोचताच ट्रकचे पुढील दोन्ही टायर फुटले. त्यामुळे ट्रक पुलावरुन थेट खाली पडला. या अपघातात चालक रावत व क्लिनर गंभीर जखमी झाल्याने ते दोघेही बेशुध्द झाले होते. 

अधिक वाचा : गिरीश महाजनांनी जळगावसाठी निधी आणला नाही : गुलाबराव पाटील 

दरम्यान हा अपघात सावळदे फाट्यावरील काही नागरीकांनी घडताना पाहिला आणि रुग्णवाहिकेला माहिती कळवली. यानंतर अपघातस्थळी रुग्णवाहिका पोहचताच जखमी झालेल्या या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले त्यानंतर अपघातग्रस्त ट्रकमध्ये कांदा असल्याचे कळताच जवळच्या नागरिकांनी कांदा घरी नेण्यासाठी झुंबड उडवली. अवघ्या अर्ध्या तासात सुमारे ३० टन कांदा नागरीकांनी घरी वाहून नेला. काही लोकांनी ट्रकची ताडपत्री व दोरखंड देखील सोडले नाही. तर दुपारनंतर प्राथमिक उपचारानंतर चालकाला घटनास्थळी सोडण्यात आले. यावेळी त्याला कांदा पळवल्याची बाब निदर्शनास आल्याने त्यांनी शिरपुर पोलिस ठाण्यात या घटनेची माहीती दिली आहे.