Mon, Apr 12, 2021 02:58
प्रशासनाच्या तपासणी रेमेडेसिव्हीर विक्रीत आढळल्या त्रुटी, मेडिकल चालकांना नोटीसा

Last Updated: Apr 08 2021 10:46PM

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करणार्‍या शहरातील पाच मेडिकलची गुरुवारी (दि.8) उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा व तहसीलदार सी. आर. राजपूत यांनी तपासणी केली. त्यात काही त्रुटी आढळून आल्याने संबंधितांना खुलासा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. शहरातील अशोका, दीपक, सायली, सोहम व सिक्स सिग्मा मेडिकलची तपासणी केली गेली.

‘सिक्स सिग्मा’मधून रेमडेसिव्हिरचे इंजेक्शन ज्या काही रुग्णांचा दिल्या गेल्या त्यांचे एचआरसीटी आदी रिपोर्ट फाईल आढळले नाहीत. तसेच 40 इंजेक्शनचा स्टॉक दाखविलेला असताना प्रत्यक्षात 120 वायल मिळून आल्या. तर, दीपक मेडिकलला अन्न व औषध प्रशासनाकडून सवलतीच्या दरात इंजेक्शन पुरविले जातात. ते 1200 रुपयांना विकणे अभिप्रेत असताना 4800 रुपयांचे बिल आढळले. सायली मेडिकलने डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन व आधार कार्ड घेऊन रेमडेसिविर दिल्याचे दिसून आले. अशोका मेडिकलमध्ये नमुनादाखल तपासणी केलेल्या दहा बिलातील दोन बिलांमध्ये एचआरसीटी व आरटीपीसीआर अहवाल मिळाला नाही. संबंधितांनी वेगवेगळे युक्तीवाद केलेत. या सर्वांना नोटीस बजावून खुलासा मागविण्याची प्रक्रिया प्रशासनाने हाती घेतली आहे.

कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार दिसून आले तर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत यापुढे फौजदारी कारवाई संबंधितांविरुद्ध करण्यात येईल. या कठीण प्रसंगी सर्व व्यावसायिकांनी नागरिकांच्या हितार्थ काम करणे आवश्यक आहे.
सूरज मांढरे,
जिल्हाधिकारी नाशिक