Tue, Sep 29, 2020 08:32होमपेज › Nashik › जळगाव : रमजीपूरमध्ये 86 जणांना डायरियाची लागण, दोघांचा मृत्यू 

जळगाव : रमजीपूरमध्ये 86 जणांना डायरियाची लागण, दोघांचा मृत्यू 

Last Updated: Dec 10 2019 10:26PM
जळगाव : प्रतिनिधी  

रावेर तालुक्यातील रमजीपूर  येथे आठवडा भरापासून दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे रमजीपूर येथील 86 जणांना  डायरियाची लागण झाली. दरम्यान, यातील दोन जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 86 पैकी तेरा रुग्ण गंभीर असून त्यांच्यावर गावातील अंगणवाडीच्या इमारतीत तात्पुरता उभरलेल्या उपचार केंद्रात उपचार सुरु आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहे. अज्ञात व्यक्ती कडून गावाला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फोडल्याने गावात दुषित पाणीपुरवठा झाला आहे. त्यामुळे डायरियाची साथ पसरल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत होते.

गावात दुषित पाणी पिल्यामुळे आठवडाभरा पासून  गावातील बऱ्याच लोकांना संडास व उलटीचे त्रास सुरु होते. मात्र दररोज दोन-चार रुग्ण असल्याने याची फारशी चर्चा झाली नाही. पण, संडास व उलटीच्या त्रासामुळे गुरुवारी दि.५ रोजी मनीषा राजू वानखेडे (वय २६) ही महिला तर रविवारी (दि. ८) रोजी याच त्रासामुळे काशिनाथ सोना तायडे (वय ५५) या दोघांच्या मृत्यू झाला त्यानंतर नागरिकांना गावात डायरियाची शंका आली.

डायरियामुळे बाधित आरोग्य कॅम्पमध्ये

डायरियाचा अधिक त्रास होत असलेल्याने गावातील पराग महाजन, दीपक महाजन, हजराबाई तडवी, वंदना महाजन, साक्षी कवडकर, कांचन महाजन, रुपाली महाजन, गोविंदा कवडकर, समशेर तडवी, मंगलाबाई महाजन, अय्युब तडवी, अकिल तडवी या तेरा जणांना या उपचार केंद्रात दाखल करून घेण्यात आले. त्यांच्यावर ऐनपूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही डी. महाजन, डॉ. संजय चौरे, यांच्यसह आठ जनाचे पथक उपचार करीत आहे. तर ३ महिन्याच्या बळावर रावेर ग्रामीण रुग्णालयात तसेच अनेक रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  दोन दिवसांपासून ऐनपूर येथील प्राथमिक आरोग्य विभागातर्फे प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षन करण्यात आले असून नागरिकांना प्रतिबंधात्मक उपचार म्हणून औषधे वितरण करण्यात आली आहे.

तहसिलदारांची भेट व पाहणी

डायरियाची साथ लागल्याची माहिती मिळताच रमजीपूरला जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे साथरोग विस्तार अधिकारी अजय चौधरी यांच्यासह तहसीलदार उषाराणी देवगुणे, पंचायत समितीच्या सभापती माधुरी नेमाडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गोपाल नेमाडे, सहाय्यक गट विकास अधिकारी हबीब तडवी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराय पाटील यांनी अंगणवाडीतील उपचार सुरु असलेल्या रुग्णांना भेट देऊन पाहणी केली.
 

 "