Tue, Sep 29, 2020 08:59होमपेज › Nashik › धुळे जिल्ह्यात कोरोनाने ६ जणांचा बळी

धुळे जिल्ह्यात कोरोनाने ६ जणांचा बळी

Last Updated: Aug 08 2020 11:28AM

संग्रहीत छायाचित्रधुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप दिवसागणीक वाढत असून कोरोनाने आणखी सहा जणांचा बळी घेतला आहे. तर १४७ बाधितांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकडा ४ हजाराच्या पार पोहोचला असून सर्वांधिक बाधित धुळे महानगरात आहेत. त्यामुळे बाधित आढळलेल्या क्षेत्रात आरोग्य सर्वेक्षण करण्याची मागणी नागरिकांच्यातून होत आहे.

धुळे जिल्ह्यात कोरोनामुळे बळी जाणाऱ्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात ६ जणांचा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेताना मृत्यू झाला. यात मिल परिसरातील सिताराम माळी चाळीतील ५० वर्षीय पुरुष,  महींदळे शिवारातील ६५ वर्षीय महिला, धुळे शहरातील ७७ वर्षीय पुरुष व ७२ वर्षीय महिला, शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील ६५ वर्षीय पुरुष आणि ६५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत धुळे जिल्ह्यात १४० जणांचा कोरोनाने बळी घेतला असन एकट्या धुळे महानगरात ७१, धुळे तालुक्यात १७ जणांचा बळी गेला आहे. धुळे शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या मिल परिसरात एकाच आठवड्यात दोन बळी गेले असून या भागात यापूर्वी पाच जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे पुढील धोका टाळण्यासाठी या भागात मनपाच्या माध्यमातून तातडीने आरोग्य सर्व्हेक्षण करण्याची मागणी करण्यात येत आहे. सध्या मनपाच्या माध्यमातून मयत बाधितांच्या रहिवास क्षेत्रात सॅनिटाईझेशन करण्यास सुरुवात झाली आहे. 

जिल्ह्यात प्रतिदिवशी सरासरी १२० पेक्षा जास्त बाधित आढळून येत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर देखील ताण येत आहे. जिल्ह्यात बाधितांचा आकडा ४ हजार ४९ वर पोहोचला असून धुळे महानगरात सर्वांधिक २११४ बाधित आढळून आले आहेत. धुळे महानगरापाठोपाठ शिरपूर तालुका व शहर हॉटस्पॉट बनले असले तरीही गेल्या आठ दिवसांत या भागातील बाधित आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आज पुन्हा या भागात ५७ बाधित आढळल्याने बाधितांची संख्या १ हजारांच्या उंबरठयावर (९७९) पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २६६५ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून बाधितांचे वाढणारे प्रमाण हे प्रशासनाची डोकेदुखी ठरते आहे.

 "