Thu, Oct 01, 2020 18:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार की जयंत पाटील ?

उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार की जयंत पाटील ?

Last Updated: Dec 07 2019 2:29AM
मुंबई : खास प्रतिनिधी
राष्ट्रवादीच्या आमदारांच्या वाढत्या दबावामुळे अजित पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित झाला असून, उपमुख्यमंत्रिपदासाठी मात्र जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात चुरस सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कुणाच्या पारड्यात आपले वजन टाकतात, याकडे राष्ट्रवादीच्या आमदारांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात मंत्रिमंडळ विस्तार तसेच खातेवाटपावर सुमारे दोन तास चर्चा झाली. यावेळी खातेवाटप लवकरात लवकर जाहीर करा, असा सल्ला पवार यांनी ठाकरे यांना दिल्याचे समजते. 

सरकारची स्थापना होऊन दहा दिवस झाले तरी अजून मुख्यमंत्र्यांसह केवळ सहा मंत्री कारभार करीत आहेत. या मंत्र्यांना खात्यांचे वाटपदेखील झालेले नाही. कोणती खाती, कोणत्या पक्षाकडे असावीत यावर अजून तिन्ही पक्षांत एकमत झालेले नाही; शिवाय काँगे्रेसमधील इच्छुकांनी दिल्लीत धाव घेतल्याने अजून अंतिम यादी तयारच 

झालेली नाही, असे सांगण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर खातेवाटप होईल अशी चर्चा होती; मात्र अजून एकमतच झालेले नसल्याने खातेवाटप रखडल्याचे समजते. आज संध्याकाळी नेहरू सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुमारे दोन तास बैठक झाली. यावेळी जयंत पाटील यांच्यासह अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते. 
हिवाळी अधिवेशन पुढच्या आठवड्यात सुरू होत असून, त्यापूर्वी विस्तार नाही, तरी खातेवाटप झाले पाहिजे, अशी भूमिका यावेळी पवार यांनी मांडली. प्रत्येक पक्षाच्या वाट्याला जी मंत्रिपदे द्यायची असतील ती त्या त्या मंत्र्यांकडे सोपवावीत, असे यावेळी ठरले. येत्या एक-दोन दिवसांत यावर निर्णय होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

विधानसभेचे अध्यक्षपद काँगेे्रसकडे गेल्याने राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. गाजलेल्या सिंचन घोटाळ्यात तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांचा संबंध नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्पष्ट झाल्याने अजित पवार यांना मंत्रिमंडळात घ्यावे, अशी राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांची इच्छा आहे. पवार यांच्या बंडाची शिक्षा म्हणून त्यांना सध्या तरी मंत्री करू नये, अशी शरद पवार यांची इच्छा असल्याचे बोलले जात असले, तरी अजित पवार हे मंत्रिमंडळात असले, तर समन्वय योग्यप्रकारे साधला जाईल, असे या आमदारांचे म्हणणे असल्याचे सांगण्यात येते. स्वतः अजित पवार हे उपमुख्यमंत्री होण्यास उत्सुक असून, जयंत पाटील यांच्याशी त्यांची चुरस आहे. अर्थात, यावर अंतिम निर्णय शरद पवार हेच घेतील. 

दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनाच्या आधी करावा, असा महाविकास आघाडीच्या आमदारांचा आग्रह आहे. मात्र, काँगेे्रसच्या पक्षश्रेष्ठींनी आपली यादीच अंतिम केलेली नाही. अनेक इच्छुकांनी दिल्लीत ठाण मांडून तेथून काही होते का, याबद्दल प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मात्र, हिवाळी अधिवेशनानंतरच विस्तार करावा, अशी काँग्र्रेस वरिष्ठ नेतृत्वाची इच्छा असून, त्यास शरद पवार यांचीही मान्यता असल्याचे समजते. या दोन्ही पक्षांत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने निर्णय घेणे अवघड असल्याचे एका नेत्याने दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले. शिवसेनेतही चुरस असली, तरी उद्धव ठाकरे हेच अंतिम निर्णय घेणार असल्याने त्यांना फारशी अडचण येणार नाही. 

तिन्ही पक्षांच्या नेत्यांना प्रादेशिक समतोल तसेच सामाजिक न्याय याचे भान ठेवून निर्णय घेण्याची कसरत करावी लागणार आहे. राष्ट्रवादीने गृह, अर्थ यासारख्या महत्त्वाच्या खात्यांवर दावा केला असून, त्यासाठी राष्ट्रवादीतच रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, तांत्रिकद़ृष्ट्या मुख्यमंत्री सर्वच खात्यांचा कारभार करू शकत असले, तरी लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप न झाल्यास हिवाळी अधिवेशनात विरोधक सडकून टीका करतील, त्यामुळे या गोष्टी लवकरात लवकर व्हाव्यात, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

 "