होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शरद पवारांनी उदयनराजेंचे जे खपवून घेतले तो त्यांचा बेशिस्तपणा: उद्धव

शरद पवारांनी उदयनराजेंचे जे खपवून घेतले तो त्यांचा बेशिस्तपणा: उद्धव

Published On: Sep 16 2019 9:35AM | Last Updated: Sep 16 2019 9:54AM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. यासंदर्भात बोलताना उदयनराजे यांनी राष्ट्रवादी पक्षात अडवा व जिरवा धोरण राबवलं गेलं. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पक्षांतरामागे हेच कारण आहे' अशी प्रतिक्रीया दिली. या घडामोडीनंतर काल (दि.१५) साताऱ्यात भाजपची महाजनादेश यात्रा काढण्यात आली. यावेळी उदयनराजे यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये कॉलर उडवून मुख्यमंत्री यांचे स्वागत केले. यासर्व पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रीया व्यक्त करत उदयनराजेंच्या स्टाईलसंदर्भात बोलत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

उदयनराजेंच्या पक्षप्रवेशावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी व्यासपीठावर असताना शिटय़ा मारणे, कॉलर उडवणे, इतर नाटय़छटा करणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाहीत (शरद पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा) याची कल्पना देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी सातारच्या राजांना एव्हाना दिली असेल. उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपचा रस्ता पकडला व भाजपात प्रवेश घेताना त्यांनी कॉलरही त्यावेळी उडवली नाही. 

याचा अर्थ असा की उदयनराजे यांना शिस्तीचे वळण लागत आहे, त्यामुळे त्यांचे अभिनंदन!', अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

 भाजपने भागाभागातील सरदार, संस्थानिकांच्या वंशकुळातील लोक आधीच घेतले व आता थेट सातारच्या राजांनाच प्रवेश देऊन ‘स्व-राज्य’ आणण्याच्या दिशेने पाऊल टाकले. अशा शब्दात उद्धव यांनी भाजपचे कौतुक केले. पण, उदयनराजे यांना जाळय़ात ओढल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाची मते पदरात पडतील असे भाजपचे गणित आहे, पण शिवराय हे फक्त एकाच जातीचे नव्हेत, तर सर्वच जाती-धर्मांच्या लोकांचे दैवत आहे. त्यामुळे शिवरायांचे तेरावे वंशज एका जातीच्या राजकारणाचे ‘मोहरे’ म्हणून राजकारणात वापरले जात असतील तर तो शिवरायांच्या विचारांचा अपमान ठरेल. अशी खोचक टीकाही त्यांनी भाजपवर केली. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी उदयनराजे यांची भाजपविषयी भूमिका वेगळी होती व ती टोकाची होती. ‘‘कोण मोदी? आमच्या साताऱयात मोदी पेढेवाले आहेत’’ असे त्यांनी मोदींचा एकेरी उल्लेख करीत बजावले होते. या गोष्टीची आठवणी उद्धव यांनी सामनाच्या अग्रलेखातून करून दिली आहे.