Mon, Sep 28, 2020 09:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'त्यावेळी' भाजपला बाहेरुन पाठिंबा का जाहीर केला?; शरद पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट 

'त्यावेळी' भाजपला बाहेरुन पाठिंबा का जाहीर केला?; शरद पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट 

Last Updated: Jul 13 2020 9:04AM

शरद पवारमुंबई : पुढारी ऑनलाईन

भाजपला २०१४ मध्ये जाहीर केलेल्या बिनशर्त पाठिंब्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझी मनापासून इच्छा होती की, शिवसेनेने भाजपसोबत जाऊ नये. ते जातील असे ज्यावेळी दिसले तेव्हा मी जाणीवपूर्वक स्टेटमेंट केले की, आम्ही तुम्हाला म्हणजे भाजपला बाहेरुन पाठिंबा देतो. हेतू हा होता की, शिवसेना त्यांच्यापासून बाजूला व्हावी. हे घडलं नाही...त्यांनी सरकार बनवलं आणि चालवलं... असा खुलासा पवार यांनी केला आहे. शरद पवार यांच्या मुलाखतीचा तिसरा भाग आज प्रसिद्ध झाला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

वाचा : सरकार पाडण्याचा कांगावाच : फडणवीस

आमचा सतत प्रयत्न होता की, भाजपच्या हातात सरकार चालवू देणं हे शिवसेनेच्या हिताचे नाही. का? दिल्लीच्या सत्ता त्यांच्या हातात. राज्याची सत्ता म्हणजेच मुख्यमंत्री त्यांच्या हातात. यामुळे शिवसेना किंवा अन्य पक्षांना लोकशाहीमध्ये त्यांच्या पक्षाचं काम करण्याचा अधिकार आहे हेच मुळात त्यांना मान्य नाही आणि त्यामुळे ते आज ना उद्या सर्वांना निश्चितपणाने धोका देणार आहेत. आणि म्हणून आमची ही एक राजकीय चाल होती, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

वाचा : चिंता बिग बींची; कर्मचार्‍यांकडे मात्र दुर्लक्ष

२०१९ मध्ये सरकार स्थापनेबाबत बोलताना पवार म्हणाले की, शिवसेनेला बरोबर घ्यायचे नाही, तुम्ही त्यात येऊन स्थिर सरकार बनवायला आम्हाला साथ द्या असे भाजपचे काही नेते आमच्या लोकांशी बोलत होते. आमच्यातल्या काही सहकाऱ्यांशी, माझ्याशीही एक-दोनदा बोललो. बोललो नाही हे खरे नाही, ते बोललेच. एक नाही. दोनदा नाही. तीनदा बोलले आणि त्याच्यामध्ये त्यांची अशी अपेक्षा होती की, प्राईम मिनिस्टर यांचे आणि माझे संबंध चांगले आहेत आणि त्यामुळे प्राईम मिनिस्टर यांनी यात हस्तक्षेप करावा आणि मी त्याला संमती द्यावी आणि म्हणून माझ्या कानावरसुद्धा हा निरोप आला. आणि त्या वेळेला तो निरोप आल्यानंतर देशाचे पंतप्रधान आहेत, पंतप्रधानांकडे आपल्याबद्दल किंवा आपल्या पक्षाबद्दल चुकीची माहिती जाऊ नये म्हणून मी स्वतः पार्लमेंटमध्ये त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांना सांगितलं की, आम्ही तुमच्यासोबत येणार नाही. जमलं तर आम्ही शिवसेनेसोबत सरकार बनवू किंना विरोधी पक्षात बसू पण आम्ही तुमच्यासोबत येऊ शकत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.   

सध्याचे सरकार पाच वर्षे चालेल याच्याबद्दल माझ्या मनात शंकाच नाही आणि अशी व्यवस्थित आम्ही काळजी घेतली तर पुढच्या निवडणुकाही आम्ही एकत्र लढवू, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.

वाचा : लग्नाचा खर्च मर्यादित; सोन्यातील गुंतवणूक वाढली

 "