Wed, May 19, 2021 05:15
परमबीर सिंग यांची याचिका निरर्थक

Last Updated: May 05 2021 2:29AM

मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

राज्य सरकारने दोन प्रकरणात सुरू केलेल्या चौकशीला आक्षेप घेणार्‍या माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग  यांच्या याचिकेलाच  राज्य सरकारने जोरदार आक्षेप घेतला. राज्य सरकारने सुरू केलेली चौकशी ही सेवेशी निगडीत प्रकरण असल्याने त्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागताच येणार नाही. त्यासंबंधी कॅटकडे दाद मागण्याची मुभा आहे. तसेच राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी परमबीर यांची चौकशी करण्यास असमर्थता दर्शविल्याने राज्य सरकारने नव्याने प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ही याचिका निरर्थक ठरते, असा दावा राज्याच्यावतीने अ‍ॅड. दरायस खंबाटा यांनी केला. याची दखल घेत न्यायालयाने याचिकेची सुनावणी 9 जूनपर्यंत तहकूब ठेवली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर राज्य सरकारने मार्च महिन्यात  परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून  उचलबांगडी  करत होमगार्डच्या पोलीस महासंचालकपदावर नेमणूक केली.   त्यानंतर राज्य सरकारने दोन प्रकरणात चौकशी सुरू केली. सरकारने सुरू केलेल्या चौकशीलाच आक्षेप घेत परमबीर यांनी अ‍ॅड. मुकुल रोहतगी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती  एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती  मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी  मुकुल रोहतगी आणि आभात पोंडा गैरहजर असल्याने याचिकेची सुनावणी तहकूब करण्याची विनंती केली. यावेळी राज्य सरकारच्या वतीने अ‍ॅड. दरायस खंबाटा यांनी  परमबीर सिंग यांच्या याचिकेलाच जारेदार आक्षेप घेतला. राज्य सरकारने सुरू केलेली चौकशी ही सेवेशी निगडित आहे तो राज्य सरकारला अधिकार आहे. त्या संदर्भात मॅटमध्ये दाद मागण्याचा सिंग यांना अधिकार आहे. मात्र त्यांना थेट उच्च न्यायालयात धाव घेऊन या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा अधिकारच नाही, असा दावा केला. तसेच राज्य सरकारने  चौकशी  करण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडेय यांंची नियुक्ती केली होती. मात्र पांडेय यांनी चौकशी करण्यास असमर्थता दर्शविल्याने राज्य सरकारने नव्याने प्राथमिक चौकशीचे आदेश काढले आहेत. त्यामुळे ही याचिका निरर्थक असल्याचा दावा केला. याची दखल घेत न्यायालयाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करून याचिकेची सुनावणी 9 जूनपर्यंत तहकूब ठेवली.

परमबीर सिंगांची भूमिका संशयास्पद : देशमुख

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन ठेवण्याचे प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वझे व मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांची भुमीका संशयास्पद  असल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. सचिन वाझे व परमबिर यांच्या गंभीर चुका माफ करण्यालायक नव्हत्या. त्यामुळेच मी त्यांची मुंबई आयुक्त पदावरुन बदली केली. त्याच रागापोटी परमबीर यांनी माझ्यावर खोटे आरोप केले.  त्यांंच्या  खोटया आरोपावरुन माझ्यावर जो गुन्हा सीबीआयने दाखल केला त्यावर न्याय मागण्यासाठी मी उच्च न्यायालयात दाद मागीतली असल्याचे देशमुख म्हणाले.