Fri, Sep 25, 2020 18:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अन्यथा सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, मराठा समाजाचा इशारा 

अन्यथा सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, मराठा समाजाचा इशारा 

Last Updated: Aug 09 2020 1:51PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक आढावा बैठक आज (दि ८) ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारने योग्य पद्धतीने हाताळावा अन्यथा याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा बैठकीतून देण्यात आला.

तसेच रोहा तालुक्यामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेमागील राजकारण दूर करून योग्य तो तपास पूर्ण करावा. त्या गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा व्हावी अशी मागणीही सरकारकडे करण्यात येणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. त्याचप्रमाणे पीडित बहिणीचे कुटुंब या संकटकाळात एकटे नसून संपूर्ण समाज त्यांच्या पाठीमागे आहे. यासाठी येत्या सोमवारी १० ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यातील समन्वयकांनी पीडित कुटुंबाला भेट देण्याचे ठरले आहेत. त्याचप्रमाणे सदर प्रकरण कोणत्याही प्रकारे दडपले जाऊ नये, गुन्हेगारांची नावे तात्काळ जाहीर करावीत.

तसेच यावेळी मराठा आरक्षणाच्या लढ्यादरम्यान ज्या आंदोलकांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सरकारने तात्काळ पूर्ण करावी. येणाऱ्या शैक्षणिक वर्षाच्या सर्व प्रवेश प्रक्रियामध्ये ५० टक्के सवलत देऊन प्रवेश देण्यात यावेत. अशा प्रकारची मागणीही सरकारकडे करण्यात येणार आहे. मराठा समाज हा त्यांच्या मागण्यांसाठी गंभीर असून मराठा समाजाच्या सर्व मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा मराठा समाज पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात येईल असा इशारा सर्वसंमतीने सरकारला देण्यात आला.

 "