Thu, Oct 29, 2020 07:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोनाचा कहर! महाराष्ट्रात ४०% मृत्यूंची नोंद

कोरोनाचा कहर! महाराष्ट्रात ४०% मृत्यूंची नोंद

Last Updated: Oct 01 2020 4:41PM

संग्रहीत छायाचित्रनवी दिल्ली : सुमेध बनसोड

देशात कोरोनामुक्त रुग्णांचा आलेख वेगाने वाढत असला, तरी कोरोनामृत्यूचा आकडा फुगत चालला आहे. दररोज सरासरी ९०० हून अधिक कोरोनारुग्णांचा मृत्यू होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सर्वाधिक कोरोनाप्रभावित महाराष्ट्रातील स्थिती अधिक भयावह आहे. राज्यात आतापर्यंत ३६ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या एका दिवसात झालेल्या एकूण मृत्यूपैकी तब्बल ४०% टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. 

बुधवार (दि.३०) काल दिवसभरात १ हजारांहून अधिक रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. एकूण मृत्यूपैकी ८२% मृत्यू हे केवळ १० राज्य, केंद्रशासित प्रदेशातील आहेत. म​हाराष्ट्रात गेल्या एका दिवसात ४८१ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटकात ८७ रुग्णांचा मृत्यू झाला. या दोन राज्यांसह उत्तर प्रदेश (६९), तामिळनाडू (६७), पश्चिम बंगाल (५९), आंध्रप्रदेश (४८), पंजाब (४७), दिल्ली (४१), छत्तीसगढ (४१) तसेच मध्यप्रदेशात (३५) सर्वाधिक मृत्यूची नोंद घेण्यात आली. दरम्यान महाराष्ट्रातील मृत्यूदर २.६% टक्के एवढा आहे. 

महाराष्ट्रासह गुजरात (२.५%), पंजाब (३%), तामिळनाडू (१.६%), कर्नाटक (१.५%), दिल्ली (१.९%) , पश्चिम बंगालमध्ये (१.९%) मृत्यूदर अधिक नोंदवण्यात आला आहे. भारतातील कोरोनामृत्यूची संख्या १ लाखाच्या उंबठ्यावर पोहचली आहे. अश्यात कोरोनामृत्यूदर कमी करण्याचे मोठे आव्हान केंद्रीय आरोग्य मंत्रालयासह विविध राज्य सरकारांना पेलावे लागणार आहे. 

गत १२ दिवसात १० लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

कोरोनोबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना सक्रिय रुग्ण संख्या १० लाखांच्या खाली स्थिर ठेवण्यात देशाला यश आले आहे. सलग दहाव्या दिवशी सक्रिय रुग्णसंख्या १० लाखांहून कमी नोंदवण्यात आली. हळहूळ या संख्येत घट होत आहे. कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ नोंदवण्यात आली असून गेल्या १२ दिवसांमध्ये तब्बल १० लाख रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे.

बुधवारी कोरोनामुक्त झालेले जवळपास ७७ टक्के रुग्ण १० राज्य, केंद्रशासित प्रदेशातील आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले असून राज्यापाठोपाठ आंध्रप्रदेश, तामिळनाडूचा क्रमांक लागतो. सक्रिय रुग्णांपैकी ७६ टक्के रुग्ण १० राज्य, केंद्रशासित प्रदेशात आहे.

 "