मुंबई : पुढारी वृत्तसेवा
पाकिस्तानातील कराची स्टॉक एक्स्चेंजवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आता मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवणार असल्याची धमकी देणारा एक कॉल सोमवारी रात्री कराचीमधून आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने 26/11 सारखा दहशतवादी हल्ला पुन्हा एकदा करण्यात येणार असल्याची धमकी दिल्याने सर्वच तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. त्यामुळे हॉटेल परिसरातील सुरक्षेसह सागरी मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
वाचा : वाढीव वीजबिल तीन हप्त्यांत भरा
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री हा धमकीचा कॉल पाकिस्तानमधून आला. हॉटेल व्यवस्थापनाकडून लगेचच याची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. या घटनेने पोलिसांसह राज्य आणि केंद्रीय तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेसह राज्य दहशतवाद विरोधी पथक आणि राज्य पोलिसांकडून कॉलचा तपास केला जात आहे. खरोखरच हा कॉल पाकिस्तानमधून आला आहे की हॉक्स कॉल आहे याचा तपास करण्यात येत आहे.
वाचा : १९६२ पर्यंतच्या खोलात जायची गरज आहे काय?; शिवसेनेचा शहांना सवाल
मुंबई पोलिसांनी ताज हॉटेल बाहेरील सुरक्षा वाढवली आहे. रात्रभर मुंबई पोलिस आणि हॉटेलच्या सुरक्षा यंत्रणेकडून हॉटेलमध्ये येणारे गेस्ट आणि त्यांच्या हालचालींवरही नजर ठेवण्यात आली. सोबतच मुंबई पोलिसांनी दक्षिण मुंबईत पेट्रोलिंग आणि नाकाबंदी यातही वाढ केली आहे. गेट वे ऑफ इंडिया आणि येथील किनारपट्टीवरील गस्त व सुरक्षा वाढवण्यात आली आहे. समुद्री गस्तीमध्येही वाढ करण्यात आली असून नौदल आणि तटरक्षक दलाला या कॉलचा अलर्टही देण्यात आला आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या कराचीमध्ये 'कराची स्टॉक एक्स्चेंज'वर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनीही ताज हॉटेलमध्ये आलेल्या या कॉलचा तपास सुरु केला आहे.