Wed, Jun 23, 2021 02:24
यंदाही आषाढीची ‘पायी वारी’ नाही

Last Updated: Jun 11 2021 2:47AM

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा धोका कायम असल्याने यंदाही आषाढीची वारी पायी निघणार नाही. परंपरेप्रमाणे पायी वारी न काढता पंढरीकडे निघणार्‍या विविध पालख्या एसटीने पंढरीत पोहोचतील. आषाढीच्या वारीचा पालखी सोहळा प्रतीकात्मक साजरा करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याचे समजते. यंदाही पायी वारी नको, असा प्रस्ताव सोलापूर जिल्हा प्रशासनानेच आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे पाठवला होता. या संदर्भात राज्य शासन दोन दिवसात नियमावली जाहीर करणार असल्याचे समजते.

पंढरपुरात गर्दी टाळावी. मात्र, चंद्रभागेतील स्नानासह पालखी सोहळा परंपरेनुसार साजरा करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्याचे समजते. आषाढी एकादशी 20 जुलै रोजी आहे. 1 जुलै रोजी संत तुकाराम तर 2 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे देहू व आळंदीतून प्रस्थान होईल.   

वारी पायी की प्रतिकात्मक?

यंदाची आषाढी वारी पायी की प्रतिकात्मक या मुद्यावरून राज्यभरातील पालख्यांमध्ये दोन तट पडले आहेत. मात्र, पायी वारीचा आग्रह धरून वारकरी संप्रदायाला बदनाम करू नका, अशी भूमिका आळंदीतील ग्रामस्थांनी आता घेतली आहे. 

दरवर्षी आषाढीला राज्याच्या उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह राज्याच्या विविध भागांतून विविध पालख्या पंढरपूरात दाखल होतात. जळगावमधील संत मुक्ताईंची पालखी सोहळा दिंडीचे 14 जून रोजी प्रस्थान होणार आहे. सुमारे 750 किमीचे अंतर पार करून ही पालखी पंढरपूरात दाखल होते. तर, राज्य शासनाला एक-दोन दिवसात पालखी सोहळ्याची नियमावली जारी करावी लागणार आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदाच्या आषाढी वारी पायी काढण्यास परवानगी द्यावी अशी मागणी वारकरी संप्रदायातील काही मंडळींनी केली आहे तर, काहींनी कोरोनाचा गंभीर धोका पायी वारी नको अशी सकारात्मक भूमिका घेतली आहे. राज्यातील 9 पालखी सोहळा प्रमुखांनी पायी वारीचा प्रस्ताव ठेवला आहे. तर आळंदीतील ग्रामस्थांनी पायी वारीला विरोध केला आहे. 

वारकरी संप्रदायाला बदनाम करायचे नसेल तर वारी गेल्या वर्षीप्रमाणेच पालखी सोहळा व पादुका एसटीतूनच पंढरपूरला जाव्यात अशी आळंदीतील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशासह देशाच्या कानाकोपर्‍यातून लोक वारीसाठी येतात. कोरोना संसर्गाचा धोका पाहता पायी वारी काढणे असो की गर्दी करणे असो राज्यासाठी धोक्याची बाब असेल. यातून पंढरीचा पांडुरंग व समस्त वारकरी संप्रदाय बदनाम होईल अशी भीती जानकार मंडळींनी व्यक्त केली आहे.