Thu, Jan 28, 2021 03:56




धनंजय मुंडे प्रकरणात नवा ट्विस्ट: ‘ती’ महिला मलाही ब्लॅकमेल करत होती; भाजप नेत्याचा दावा

Last Updated: Jan 14 2021 4:23PM




मुंबई: पुढारी ऑनलाईन

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. विरोधकांनी मुंडे यांनी मंत्रिपदाच्या राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मुंडे आता मत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी मुंडे प्रकरणात नवा ट्विटस निर्माण केला आहे. 

एका वृत्तवाहिनीशी बोलतना भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी त्यांच्याबाबतीत नेमकं काय घडलं याचा खुलासा केला आहे. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केलेल्या बी टाऊनच्या गायिका रेणु शर्मा यांनी मलाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा हेगडे यांनी केला आहे. तसेच हेगडे यांनी सविस्तर पत्र लिहित मुंबई पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली आहे. 

२०१० पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होत्या. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या. मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी २०१५ पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले, अशी धक्कादायक महिती हेगडे यांनी वृत्तवाहिनीशी बोलता दिली.

हेगडे पुढे म्हणाले की, मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला समजली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करावी, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

मी तिला स्पष्टपणे सांगितलं होतं, की मला तुम्हा भेटण्यात अजिबात रस नाही, मग त्यांच्या मागणीनुसार रिलेशनशीप ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. अगदी ६ आणि ७ जानेवारी २०२१ रोजीही त्यांनी मला व्हॉट्सअॅप केले. मी थंबचा इमोजी पाठवण्याशिवाय काहीच रिप्लाय दिला नाही, अशी माहितीदेखील हेगडे यांनी दिली. 

दोन दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात मीडियामध्ये केलेले आरोप वाचून मी थक्क झालो. त्याच वेळी मी रेणू शर्मा यांच्याबद्दल तुम्हाला सांगण्याचा निर्णय घेतला, असंही हेगडेंनी यांनी यावेळी म्हटले आहे.