Wed, Aug 05, 2020 19:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चिंता बिग बींची; कर्मचार्‍यांकडे मात्र दुर्लक्ष

चिंता बिग बींची; कर्मचार्‍यांकडे मात्र दुर्लक्ष

Last Updated: Jul 13 2020 1:30AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई महापालिका मुख्यालयासह विभाग कार्यालयांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह कर्मचार्‍यांची संख्या वाढत असताना, या कार्यालयाच्या निर्जंतुकीकरणाला महापालिका प्रशासनाने महत्त्व दिलेले नाही. मात्र बिग बी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पालिकेला मोठी चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे बिग बींच्या घराशेजारील कार्यालयात येणारे तीन दिवस दररोज निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या मृत्यूचे प्रशासनाला सोयरसुतक नसल्याचे स्पष्ट झाले.

मुंबई महापालिकेच्या 2 हजार 200 पेक्षा जास्त कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 103 पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. यात उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व अभियंत्यांचा बळी गेला आहे. सांताक्रूझ, वांद्रे पूर्वेला वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत असलेल्या सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचा शनिवारी कोरोनाने बळी घेतला. पालिका कर्मचार्‍यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, त्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ नाही. पालिका मुख्यालयासह 24 विभाग कार्यालयांमध्ये व पालिकेच्या अन्य इमारतींमध्ये दररोज निर्जंतुकीकरण होणे आवश्यक आहे. पण याला फारसे महत्त्व प्रशासनाने दिले नसल्याचा आरोप कर्मचार्‍यांनी केला आहे. पण ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजतात पालिकेची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे.

अमिताभ यांच्या जुहू येथील प्रतीक्षा व जलसा बंगल्यांसह त्यांच्या कार्यालयात येणारे तीन दिवस निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश थेट राज्य सरकारकडून महापालिकेला देण्यात आले आहेत. त्यामुळे पालिका मुख्यालयातून अंधेरी के-पश्चिम विभाग कार्यालयाला तातडीने निर्जंतुकीकरण व अन्य उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत, तर अमिताभ व त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आलेले कर्मचारी, सुरक्षारक्षक व अन्य नातेवाईक यांचा शोध घेऊन त्यांची चाचणी करण्याची सूचना करण्यात आल्याचे समजते. दरम्यान पालिकेच्या के-पश्चिम विभागाचे कर्मचारी व अधिकारी अभिताभ यांच्या बंगल्यात तैनात करण्यात आले आहेत. बंगल्यातील कोपरा कोनाकोपरा त्याशिवाय आजूबाजूचा परिसर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्तांनी दिल्या आहेत. विशेष म्हणजे हे निर्जंतुकीकरण वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. अमिताभ बच्चन यांच्यासाठी पालिकेकडून एवढी कार्यतत्परता दाखवण्यात येत असल्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

कर्मचार्‍यांच्या जिवाचे मोल 50 लाख का ?

पालिका कर्मचार्‍यांना जीव महत्त्वाचा असून 50 लाख रुपयांचे अनुदान नाही. कोरोनामुळे कर्मचार्‍यांचा जीव जात असताना, त्यांच्या सुरक्षिततेकडे पालिकेने अमिताभ यांच्यापेक्षा जास्त लक्ष दिले पाहिजे. कर्मचारी आपल्या कार्यालयात पोहोचण्यापूर्वी दररोज या कार्यालयाचे निर्जंतुकीकरण झालेच पाहिजे. एवढेच नाही तर ते राहात असलेल्या पालिकेच्या वसाहतीमध्ये दररोज निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.
- रमाकांत बने, कामगार नेता

निर्जंतुकीकरणाकडे दुर्लक्ष नाही

हॉस्पिटल व महापालिका इमारतीच्या आतील बाजूस कीटकनाशक विभागातील कर्मचार्‍यांमार्फत, तर बाहेरील बाजूस अग्निशमन दलाच्या जवानांमार्फत सोडियम हायपोक्लोराईटची फवारणी करण्यात येत आहे. कस्तुरबा हॉस्पिटलसह ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात, अशा हॉस्पिटलमध्ये दररोज फवारणी होत आहे. मंडई, कोरोना रुग्ण आढळला अशा इमारती व परिसर, विलगीकरण कक्ष, मुंबई महापालिकेची कार्यालये  अन्य सार्वजनिक ठिकाणी साप्ताहिक सोडियम हायपोक्लोराईटची फवारणी सुरू आहे. नागरिकांनी मागणी केल्यानंतर जेथे आवश्यक असेल तेथे फवारणी करण्यात येईल.

- वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुंबई महापालिका