Thu, Oct 01, 2020 18:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जेवढी भरती मोठी तेवढीच ओहोटी मोठी; बाळासाहेब थोरातांचा भाजपला टोला

जेवढी भरती मोठी तेवढीच ओहोटी मोठी; बाळासाहेब थोरातांचा भाजपला टोला

Last Updated: Dec 05 2019 7:11PM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे पक्ष सोडून गेलेल्या मंडळींच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी ६ आमदार आणि राज्यसभेतील दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा माध्यमांसमोर केला. त्यामुळे भाजप मधील काही असंतुष्ट नेते मंडळी पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जेवढी भरती मोठी तेवढीच मोठी ओहोटी, हा तर निसर्ग नियम असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्रिमंडळातील सदस्य बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलाताना दिली. 

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी भाजपमधील असंतोषावर काही सुचक विधाने केली. भाजपमधील काही सक्षम अशा नेतृत्वांना दुर्दैवाने दूर ठेवण्यात आले किंवा त्यांना दूर लोटले गेले, असे वाटणे स्वाभाविक आहे. जेवढी भरती मोठी, तेवढीच ओहोटी मोठी हाच तर निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे मला वाटते की ही ओहटी देखील सुरू झालेली आहे. असे मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

काँग्रेस पक्षातून जे आम्हाला सोडून गेले ते सध्या फार अस्वस्थ आहेत हे खरे आहे. आपण चुकीच्या वेळेस गेलो, आपण फसलो ही भावना त्यांच्यात आहे. ते पुन्हा काँग्रेसमध्ये येतील की नाही यावर आमची सध्या चर्चा झालेली नाही. मात्र आम्हाला सोडून गेलेल्यांबरोरच भाजप मधील जी जुनी मंडळी आहेत, ती देखील अस्वस्थ आहेत ही वस्तूस्थिती आहे. अद्याप आमची कुणाशीच चर्चा झालेली नाही, परंतु त्यांच्यातील अस्वस्थता आम्हाला जाणवत आहे. असे देखील बाळासाहेब थोरात म्हणाले. 

माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या भाजपातील नाराजीच्या बातम्या पसरल्या आणि त्यांना ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भेटले, तेव्हापासून या चर्चांना उधाण आले आहे. खडसे यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. त्याला धरून चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रकाश मेहता या दोन माजी मंत्र्यांची नावे नाराजांमध्ये घ्यायला सुरूवात झाली. त्यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले जयकुमार गोरे (माण, सातारा), कालिदास कोळंबकर  (वडाळा, मुंबई), राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी, अहमदनगर), नितेश राणे (कणकवली, सिंधुदुर्ग), काशिराम पावरा (शिरपूर, धुळे), रवीशेठ पाटील (पेण, रायगड) तर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले बबनराव पाचपुते (श्रीगोंदा, अहमदनगर), राणा जगजितसिंह पाटील (तुळजापूर, उस्मानाबाद), नमिता मुंदडा (केज, बीड) यांच्यासह अनेकांच्या नावाभोवती या चर्चा फिरत आहेत.

भाजपने पक्ष फोडण्याचे जे काम केले, त्या मार्गाने आम्हाला जायचे नाही. राज्य कोणत्याही परिस्थिती मिळवण्यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न जे देवेंद्र फडणवीस सरकारने केले. त्याची महाराष्ट्राने त्यांना शिक्षा दिलेली आहे.
- जयंत पाटील, मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष.

आम्ही १०५ आमदार संपूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहोत. भाजपचे १२ आमदार महाराष्ट्र विकास आघाडीच्या संपर्कात हे वृत्त म्हणजे निव्वळ अफवा आणि चोराच्या उलट्या बोंबा आहेत. प्रत्यक्षात सरकार स्थापन होऊन आठ दिवस होत आले तरी साधे खातेवाटही करू शकले नाहीत. दिलेली आश्वासने पूर्ण करु शकत नाहीत. त्यामुळे तिघाडीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. ती लपविण्यासाठी आता भाजपच्या नावाने उलट्या बोंबा मारल्या जात आहेत.
- आशिष शेलार, भाजप आमदार.

 "