Sun, Aug 09, 2020 13:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही'

'राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही'

Last Updated: Jul 08 2020 12:20PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई : पुढारी ऑनलाईन

राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

वाचा : 'डॉ. बाबासाहेब यांच्यावरील श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही'

राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्त्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्हं असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य आहे. राज्य शासनानं घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून तपासकार्य सुरू केलंय, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे. 

वाचा : 'राजगृह' हल्ला; आरोपींना तात्काळ अटक करा, फडणवीसांची मागणी

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत. आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी पुढे म्हटले आहे. नागरिकांनी असं दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नये. शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले आहे. 

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले 'राजगृहा'वर काल (ता.७) दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोडही केली आहे. घराच्या काचांवरही दगडफेक करण्यात आली आहे. यात घरातील कुंड्यांही फोडण्यात आल्या आहेत. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. 

वाचा :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहाची अज्ञातांकडून तोडफोड! (video)

बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतके महत्त्वाचे हे स्थान मानले जाते. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. काल संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. यात त्यांनी घराबाहेरील सीसीटीव्हीचेही मोठे नुकसान केले आहे.