Wed, Aug 05, 2020 18:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार 

शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार 

Last Updated: Jul 06 2020 1:16AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर तिच्याच मित्रासह तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मानखुर्द परिसरात घडली. या महिलेच्या तक्रारीवरुन मानखुर्द पोलिसांनी मित्रासह तिघांविरुद्ध सामूहिक बलात्कारासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. याच गुन्ह्यांत चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. 

अब्दुल जिलानी सत्तार शेख, मुद्दसीर मेहबूब शेख, मोहम्मद मुदशीर नबी शेख आणि फैजलअली सरदार शेख अशी या चौघांची नावे असून सध्या ते चौघेही पोलीस कोठडीत आहेत. पीडित महिलेला तिच्या मित्राने आपल्या मित्राच्या मुलाचा वाढदिवस असल्याची बतावणी करून तिला आमंत्रण दिले. वाढदिवस सुरू असताना तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देत या चौघांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचे तपास अधिकारी आदिनाथ गावडे यांनी सांगितले. 

धारावी येथे 44 वर्षांची पिडीत महिला ही तिच्या कुटुंबियांसोबत राहते. अविवाहित असलेली ही महिला विमा एजंट म्हणून काम करते. यातील अब्दुल जिलानी शेख हा धारावी परिसरात राहत असून ते दोघेही एकमेकांशी परिचित आहेत. त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. 24 जूनला अब्दुल तिला भेटला, मानखुर्द येथे त्याचा एक मित्र राहत असून त्याच्या मुलाचा वाढदिवस आहे, या वाढदिवसाला त्याने आपल्याला निमंत्रण दिले आहे, त्यामुळे आपल्याला तिथे जावेच लागेल असे सांगितले. अब्दुलचा खास मित्राच्या मुलाचा वाढदिवस असल्याने तिनेही त्यास होकार दिला. त्यानंतर ते दोघेही मानखुर्द येथे त्याच्या मित्राच्या घरी गेले. तिथे अब्दुलने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले, काही वेळानंतर तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध झाली होती. 

या घटनेनंतर अब्दुलसह त्याच्या तीन मित्रांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला होता. शुद्धीवर आल्यानंतर अब्दुल तिला घेऊन टॅक्सीतून धारावी येथे आला, घडलेला प्रकार कोणालाही सांगू नकोस असेही त्याने तिला सांगितले, दुसर्‍या दिवशी तिला पोटात वेदना होऊ लागल्या, त्यामुळे ती जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये गेली, तिथे तपासणी केल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे उघडकीस आले. तिथेच तिच्यावर उपचार सुरु होते. 2 जुलैला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच तिने मानखुर्द पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पोलीस निरीक्षक आदिनाथ गावडे यांना घडलेला प्रकार सांगून तिने चारही आरोपींविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती.

तिच्या तक्रारीनतर चारही आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता, गुन्हा दाखल होताच या चारही आरोपींना धारावी आणि मानखुर्द परिसरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. चारही आरोपी 28 ते 35 वयोगटातील आहेत, एक आरोपी मानखुर्द तर इतर तिघेही धारावी कॅम्प परिसरात राहत असल्याचे पोलीस निरीक्षक आदिनाथ गावडे यांनी सांगितले.