Sun, Sep 20, 2020 09:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत मृतदेहांना अत्यंविधीची प्रतीक्षा

मुंबईत मृतदेहांना अत्यंविधीची प्रतीक्षा

Last Updated: Jun 03 2020 12:57AM
मुंबई  : पुढारी डेस्क

मुंबई परिसरात सद्यस्थितीत 11 विद्युत दाहिन्या असून त्यांची कार्यक्षमता नेहमीपेक्षा दुप्पट करण्यात आली असूनही अनेक मृतदेहांना तासंनतास अत्यंविधीची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे मृताच्या आप्तांचा प्रचंड मनस्ताप होत आहे.

वरळीच्या स्मशानभूमीतील एका कर्मचार्‍याने  सांगितले, कोरोनाची लागण होण्यापूर्वी एका महिन्यात जेमतेम 30 मृतदेह या स्मशानभूमीत येत होते. मात्र मे महिन्यात तब्बल 226 मृतदेह आले. ही संख्या वर्षभराची आहे. मुंबईत महापालिकेचे 49  आणि 20 खाजगी स्मशानभूमी आहेत. ज्या ठिकाणी अंत्यविधी सुरू आहेत. तेथे तासंनतास प्रतीक्षा करावी लागत आहे.

बोरिवलीच्या दौलतनगर येथील 55 वर्षीय मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी तब्बल 12 तास प्रतीक्षा करावी लागली. मालाड  (पू) च्या आप्पापाडा झोपडपट्टीतील एका राहिवासी 25 मे रोजी शताब्दी रुग्णालयात निधन झाले. त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल न आल्याने अंत्यसंस्कार रखडले.

एका घटनेत कोरोना संशयिताचा मृतदेह सर्व सोपस्कार पूर्ण केल्यावर रात्री उशिरा बाहेर काढण्यात आला. तो मृतदेह सुरुवातीला लोखंडवाला नजिक वडारपाडा येथील स्मशानभूमीत नेण्यात आला. मात्र तेथे केवळ कोरानाग्रस्तांच्या मृतदेहांवरच अंत्यसंस्कार होत असल्याने त्यांनी नकार दिला. तेथून तो मृतदेहद दौलत नगर स्मशानभूमीत घेऊन गेल्यावर तेथे दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसहापर्यंत मृताच्या नातेवाईकांना प्रतीक्षा करावी लागली.

कोरानाग्रस्ताच्या मृत्यूनंतर सुरुवातीला मृतदेह शवागरात ठेवला जातो. त्याच्यावर अन्य सोपस्कार केल्यानंतर पोलिसांच्या माध्यमातून मृतदेह नातेवाईकांकडे थेट सुपूर्द न करता रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे रवाना केला जातो. आवश्यक असलेल्या रुग्णवाहिकेची सोय करतांना मृताच्या नातेवाईकांना प्रचंड त्रास होत असल्याने अंत्यविधीस विलंब होत असतो. तसेच अंत्यविधीस विलंब होत असल्यास रुग्णवाहिकेचे अवाजवी प्रतीक्षा शुल्क अदा करावे लागते. 

मृतदेह असलेल्या एका रुग्णवाहिकेच्या चालकाने अंत्यविधीस विलंब होत असल्याने तसेच अन्य एका मृतदेहास आणायचे असल्याचे सांगून मृतदेह अन्य रुग्णवाहिकेत हलवण्यास सांगितल्याची घटना अलिकडेच मध्यरात्री घडली आहे. अन्य रुग्णवाहिकेसाठी 1 हजार रुपये आणि 300 रुपये प्रतीतास प्रतीक्षा शुल्काचा भुर्दंड मृताच्या नातेवाईकांना बसला आहे. मृताच्या नातेवाईकांनी अखेर तडजोड करत 3 हजार 500 रुपयांत अंत्यविधी होईल, तोपर्यंत हे प्रकरण मिटवले.

शिवाजी पार्क दादर, चंदनवाडी काळबादेवी, आणि वरळी येथील काही विद्युत दाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने येथील अंत्यविधीची क्षमता सद्यस्थितीत जेमतेम अर्धी झाली आहे. त्यामुळे अंत्यसंस्काराला विलंब लागतो.

कोराना बाधितांचे मृतदेहाचे विद्युत वाहिनीद्वारे किंवा जमिनीत पुरून दहन केले जाते. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नयेे, यासाठी बाधितांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावतांना विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

 "