Sun, Sep 20, 2020 10:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रवासी मजुरांसाठी काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव

प्रवासी मजुरांसाठी काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव

Last Updated: May 27 2020 4:17PM

file photoनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनाची महामारी तसेच लॉकडाऊनमुळे देशातील प्रवासी मजुरांवर ओढावलेल्या संकटाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. याप्रकरणात आपलीही बाजू ऐकूण घेण्याची विनंती करणारी याचिका बुधवारी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांनी न्यायालयात दाखल केली. प्रवासी मजुरांसंबंधी निश्चित उपाययोजनांची माहिती न्यायालयासमक्ष सादर करण्याची संधी द्यावी, अशी विनंती त्यांच्याकडून करण्यात आली आहे. देशभरातील प्रवासी मजुरांना होणाऱ्या त्रासाची दाहकता कमी करण्यासाठी केंद्राकडून आवश्यक पावले उचलण्यासंबंधीच्या अनेक सूचना सुरजेवाला यांनी ​न्यायालयाकडे सादर केल्या आहेत. या सूचनांचा सुनावणीत फायदा होईल, असा विश्वास याचिकेतून व्यक्त करण्यात आला आहे. 

देशात किती प्रवासी मजूर आहेत यासंबंधीचा अचूक माहिती केंद्र सरकारकडे नाही. देशव्यापी कृती योजना कार्यान्वित करण्यात आली नाही, असा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. जिल्हा तसेच ग्रामीण पातळीवर सर्व मजुरांची माहिती एकत्रित करून त्यांच्या याद्या केंद्राने तात्काळ तयार करण्याची मागणीही सुरजेवाला यांच्याकडून करण्यात आली. केंद्र सरकारने मजुरांना स्वगृही सोडण्यासाठी पुढाकार घेत जिल्हा तसेच ग्रामीण स्तरावर स्वागत कक्ष, सुविधा केंद्र सुरु करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.
 
प्रवासादरम्यान मजुरांना मिळालेल्या सुविधाची माहिती त्यांच्याकडून एकत्रित करून त्याआधारे केंद्राने प्रवासी मजूरांच्या समस्येकडे लक्ष दिले, तर देशव्यापी कृती आरखडा तयार करता येवू शकतो, असेही याचिकेतून सूचवण्यात आले आहे. अडकलेल्या मजुरांना अन्न, औषधे तसेच निवाऱ्याच्या मोजक्याच सुविधा उपलब्ध आहेत. मजुरांना त्यामुळे स्वयंसेवी संस्था तसेच इतरांवर अवलंबून राहावे लागत आहे. केंद्र सरकारने त्यामुळे त्यांना अन्न, औषधी तसेच निवारा उपलब्ध करवून देण्यासाठी एक योजना तयार करावी, असे आदेश न्यायालयाने केंद्राला द्यावेत अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे. 


 

 "