होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'सोंगटी' म्हणत राज यांचा भाजपने काढला चिमटा 

'सोंगटी' म्हणत राज यांचा भाजपने काढला चिमटा 

Published On: Sep 21 2019 7:04PM | Last Updated: Sep 21 2019 7:20PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच भाजपने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना छेडले आहे. भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून राज यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडत व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांचा समाचार घेतला आहे. 'विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या, आता ही सोंगटी कोणत्या चौकटीत पडणार?? शेवटी जनतेच्या मनोरंजनाचा प्रश्न आहे...!!' असे म्हणत राज ठाकरे यांना कोपरखळी मारली आहे. 

राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकावेळी राज यांनी प्रचारांचा धडाका लावला होता. यात राज ठाकरे यांनी 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. तर, मतदार राज्याला काँग्रेसला मत देण्यास सांगितले होते. पण, राज्यात लोकसभेचा निकाल काही वेगळाच लागला. 

राज यांनी घेतलेल्या भूमिकांचा लेखाजोखा या व्यंगचित्राच्या माध्यमातून मांडला आहे. या व्यंगचित्रात राज यांनी राजकारणातील ठिक्कर खेळ खेळत असल्याचे दाखवले आहे. 

यात राज यांनी २००४ मध्ये शिवसेना त्यांनतर २००९ मध्ये स्वत:चा पक्षाची स्थापना करत विधानसभा लढली होती. त्यानंतर २०१४ ला भाजपला साथ द्या, अशी हाक दिली आणि त्यानंतर त्यांनी आता २०१९ मध्ये भाजपला विरोध करत काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केले होते. पण, आता २०१९ ला राज कोठे जाणार? ते कोणाला जवळ करणार? हेच उमगत नसल्याने ती शेवटची चौकट मोकळी ठेवली असून त्यात प्रश्नचिन्ह देण्यात आले आहे. तर, या खेळात वापरण्यात येणारी ‘सोंगटी’ म्हणून राज यांना संबोधत त्यांची खिल्ली उडविली आहे.