Mon, Sep 28, 2020 09:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नगरची जागा काँग्रेसला; विखेंसाठी राष्ट्रवादीचे नमते

नगरची जागा काँग्रेसला; विखेंसाठी राष्ट्रवादीचे नमते

Published On: Mar 02 2019 1:44AM | Last Updated: Mar 02 2019 1:41AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी 

काँग्रेस ˆ राष्ट्रवादी काँग्रेसमधील अहमदनगर लोकसभेच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. ही जागा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे ˆ पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्यासाठी सोडण्यास राष्ट्रवादी राजी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. तर, शिवसेना ˆ भाजप युतीने दुखावलेले नारायण राणे हे पुन्हा काँग्रेस ˆ राष्ट्रवादी काँग्रेसकडे झुकण्याची शक्यता असून सिंधुदुर्ग ˆ रत्नागिरी लोकसभेची जागा राणेंसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यावर एकमत झाल्याचेही समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली अहमदनगरच्या जागेवर डॉ. सुजय विखे यांनी दावा करीत आपला प्रचार सुरु केला होता. ही जागा काँग्रेसला सोडावी म्हणून राधाकृष्ण विखे ˆ पाटील यांनीही विविध मार्गाने दबाव टाकला होता. या जागेसाठी भाजपसह अन्य पक्षात जाण्याची तयारीही दाखविली होती. मात्र, तरीही राष्ट्रवादी काँग्रेस जागा सोडत नसल्याने विखेंनी शरद पवार हे आपल्याला पितृतुल्य आहेत. त्यांनी नातवासाठी जागा सोडावी, अशी विनवणीही केली होती. अखेर शरद पवार यांनी ही जागा सुजय विखेंसाठी सोडली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. अहमदनगर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस लढत असली तरी या जागेवर सातत्याने भाजपचे खासदार दिलीप गांधी हे निवडून येत आहेत. सुजय विखे हे या लोकसभा निवडणूक लढवून राजकारणात सक्रीय होत आहेत. काही झाले तरी या जागेवरुन निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

नगरच्या जागेच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग-रत्नागिरीची जागा घेण्याची शक्यता आहे. शिवसेना ˆ भाजपची युती झाल्याने स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणेे नाराज आहेत. सिंधुदुर्ग ˆरत्नागिरी मतदारसंघातून पुन्हा विनायक राऊत यांना युतीची उमेदवारी निश्‍चित झाली आहे. त्यामुळे राणे सध्या एकाकी पडले आहेत. अशावेळी राष्ट्रवादी ही जागा आपल्या कोट्यात घेऊन ती निलेश राणे यांच्यासाठी सोडू शकते, अशी चर्चा आहे. काँग्रेस सोडलेल्या राणेंना पुन्हा काँग्रेस थेट मदत करु शकत नसल्यानेच हा पर्याय काढण्यात आला. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी सिंधुदुर्गमध्ये राणेंची त्यांच्या घरी भेट घेतली होती.