Sun, Sep 20, 2020 08:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोनामुळे वडाळ्याचा जीएसबी गणेशोत्सव रद्द

कोरोनामुळे वडाळ्याचा जीएसबी गणेशोत्सव रद्द

Last Updated: May 26 2020 1:27AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोनामुळे सर्वच सणांना कात्री लागलेली असताना आता गणेशोत्सव मंडळांकडूनही या विघ्नापोटी उत्सव रद्द करण्यास सुरूवात झाली आहे. वडाळ्यातील जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव समितीने कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी फेब्रुवारी महिन्यात येणारा माघी गणेश जयंतीचा उत्सव साजरा करणार असल्याचे मंडळाचे विश्वस्त सचिव मुकुंद कामत यांनी सांगितले.

कामत म्हणाले की, दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या नियमावलीनुसार गर्दीचे नियोजन करणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून यंदा गणेशोत्सव साजरा करण्याऐवजी माघी गणेश जयंती साजरी करण्याचे समितीने ठरविले आहे. गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेंद्र दहिबावकर यांनी मंडळाच्या निर्णयाबाबत कल्पना असल्याचे सांगितले. 

किंग्ज सर्कलचा अद्याप निर्णय नाही

जीएसबी वडाळा मंडळाने उत्सव रद्द केला असून मुंबईतील सर्वात श्रीमंत गणेशोत्सव मंडळ असलेल्या जीएसबी किंग्ज सर्कल अर्थात जीएसबी सेवा मंडळाने अद्याप उत्सव रद्द केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. लाखो भाविक गर्दी करणार्‍या किंग्ज सर्कल येथील या सर्वात श्रीमंत मंडळाने महाराष्ट्र शासनाच्या नियमावली नंतरच योग्य तो निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा प्रकारे उत्सव पुढे ढकलणे, धार्मिकदृष्ट्या योग्य नसल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाच्या नियमावली नंतर जीएसबी सेवा मंडळाची व्यवस्थापन समिती आपला निर्णय जाहीर करेल, असे एका विश्वस्ताने दैनिक पुढारीला सांगितले.

 "