Sat, Aug 15, 2020 13:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती

धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती

Published On: Jun 19 2019 2:07AM | Last Updated: Jun 19 2019 2:07AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी 

धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण देण्यात असलेली तांत्रिक अडचण पहाता धनगर समाजाला आदिवासींच्या धर्तीवर खास सवलती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यासाठी अर्थसंकल्पात 1 हजार कोटींची तरतूद करण्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. भाजपने धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, त्यास आदिवासी समाजाचा असलेला विरोध आणि धनगर समाजाला आदिवासी ठरविण्यात येत असलेले अडथळे पहाता राज्य सरकारने त्यावर अर्थसंकल्पातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. 

आदिवासींच्या धर्तीवरच धनगर समाजासाठी विविध 22 योजना राबविण्यात येणार आहेत. भूमीहीन मेंढपाळ कुटुंबासाठी मेंढीपालनासाठी अर्धबंदिस्त आणि बंदिस्त जागा उपलब्ध करून दिली जाईल, किंवा जागाखरेदीसाठी अनुदान तत्वावर अर्थसहाय्य दिले जाणार आहे.मेंढ्यांसाठी विमा संरक्षण. वसतीगृह प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना स्वयंसहाय्य योजना, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजनेसह शहरांतील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून प्रवेश देण्यात येणार असून परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. 

 धनगर समाजातील 10 हजार बेघर कुटुंबांना पहिल्या टप्प्यात  घरकुले बांधून देण्याबरोबरच धनगर समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 1 हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. ही तरतूद राज्याच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातून केली जाणार आल्याने आदिवासी विकास विकास विभागाच्या बजेटवर काहीही परिणाम होणार नाही, अशी ग्वाही अर्थमंत्र्यांनी दिली. तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आदींसाठी ओबीसी मंत्रालयाला 2 हजार 814 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

धनगरांना आरक्षण द्या, निधी नको : प्रकाश शेंडगे यांची टीका

 धनगर समाजाला आरक्षण देण्याचे वचन देऊनही आता केवळ अर्थसंकल्पात हजार कोटींची तरतूद करून सरकारने धनगरांची फसवणूक केल्याची टीका आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. निधीच द्यायचा होता, तर साडेचार वर्षे का दिला नाही? असा सवालही शेंडगे यांनी केला आहे.

2014 साली देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाला पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा शब्द बारामती येथे दिला होता. त्यानंतर पंढरपूर येथे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव  ठाकरे यांनीही विठ्ठलाला साक्षी ठेवून धनगर समाजाला दिलेले वचन हे शिवसेनेचे वचन असून येत्या विधानसभा निवडणुका आधी ते आम्ही पूर्ण करू अशी गर्जना केली होती. असे असताना आता आरक्षणाऐवजी पैसे घ्या असे भाजपा-शिवसेना सरकार म्हणत असेल तर हा समाजाचा विश्‍वासघात आहे, असे शेंडगे यांनी म्हटले आहे.