Wed, May 19, 2021 06:04
तीन पोलीस अधिकारी महासंचालकपदी

Last Updated: May 05 2021 2:21AM

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील रिक्त असलेल्या पोलीस महासंचालक पदांवर नियुक्त्या देण्यास अखेर गृहमंत्रालयाला मुहूर्त मिळाला आहे. राज्य पोलीस दलातील तीन वरिष्ठ अधिकार्‍यांना सेवाज्येष्ठतेनुसार पोलीस महासंचालक पदी बढती देण्याचे आदेश मंगळवारी गृहमंत्रालयाने जारी केले आहेत. यात ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे.

1988 बॅचचे आयपीएस अधिकारी के. व्यंकटेशम हे विशेष कृती अभियानचे अप्पर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. त्यांना बढती देत नागरी हक्क संरक्षण विभागाच्या संचालकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. व्यंकटेशम यांना त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत म्हणजे मे 2022पर्यंत पोलीस महासंचालकपदाचा कार्यकाळ मिळणार आहे. राज्य लोहमार्गचे अप्पर पोलीस महासंचालक आणि 1989 बॅचचे आयपीएस अधिकारी संदीप बिष्णोई यांना बढती देत न्यायिक व तांत्रिक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. बिष्णोई यांना एप्रिल 2024 पर्यंत कार्यकाळ मिळणार आहे.

गेल्या काही महिन्यांत डी. कनकरत्नम, एस. एन. पांडे आणि बिपीन बिहारी हे तीन अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत, तर राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्यासह गुप्तचर वार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला या केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेल्या आहेत. त्यामुळे पोलीस महासंचालक दर्जाची पदे रिक्त होती.

ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त कोण?

विवेक फणसाळकर यांची बदली झाल्यानंतर ठाणे आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सह पोलीस आयुक्त सुरेश कुमार मेखला यांच्याकडे देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाण्याचे नवीन पोलीस आयुक्त कोण याबाबतदेखील उत्सुकता कायम आहे. राज्याची कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग (1989 आयपीएस बॅच), दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख जयजित सिंग (1990), आस्थापना विभागाचे प्रमुख कुलवंत कुमार सरंगल यांच्यापैकी एकाचे नाव ठाणे आयुक्तपदासाठी निश्चित होऊ शकते अशी चर्चा आहे. त्यातही भूषणकुमार उपाध्याय (1989) हेही बढतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांची जर बढती आणखी रखडली तर त्यांचीही ठाण्याच्या आयुक्तपदी वर्णी लागण्याची शक्यता असल्याची चर्चा डिपार्टमेंटअंतर्गत आहे.

1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले विवेक फणसाळकर यांनी ठाण्याचे 22 वे पोलीस आयुक्त म्हणून 31 जुलै 2018 रोजी पदभार स्वीकारला होता. स्वच्छ प्रतिमा, प्रामाणिक स्वभाव आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून पोलीस दलात ओळख असणारे विवेक फणसाळकर यांनी प्रसिद्धी माध्यमातून चर्चेत राहणार्‍या कारवाईवर भर देण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेला दिलासा देणार्‍या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित केले. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, अमली पदार्थ विरोधी मोहीम व जनजागृती, वाहतूक कोंडी, सायबर गुन्हेगारी, दुचाकी चोरी आणि समाज विघातक गुंडांवर कडक कारवाई आदी कामांना सुरुवातीलाच हात घातला. पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारी कमी करण्यासोबतच तक्रारदारांच्या सोबत पोलिसांनी खंबीरपणे उभे राहावे, अशी भूमिका घेतली. सहाजिकच त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालयातला कारभार लोकाभिमुख झाला.

कोरोना काळात तर फणसाळकर यांनी अत्यंत जागरूक राहून आपली जबाबदारी पार पाडली. स्थलांतरित मजुरांना पोलिसांनी दिलेला मदतीचा हात असो अथवा रक्तदानाचे कार्य अशा सगळ्याच कार्यात त्यांनी आपल्या टीमचे सतत कौतुक करून त्यांचे मनोबल उंचावले. कोरोनामुळे शहीद झालेल्या कुटुंबीयांच्या पाल्यांना तातडीने अनुकंपा तत्त्वावर नोकरीवर घेण्याच्या त्यांच्या उपक्रमाची राज्याचे पोलीस महासंचालकांनीही स्तुती केली होती.