Mon, Apr 12, 2021 03:17
'वाझेच पत्र गंभीर, सत्य बाहेर आले पाहिजे'; फडणवीस यांची मागणी

Last Updated: Apr 08 2021 11:14AM

देवेंद्र फडणवीस
नागपूर : पुढारी ऑनलाईन

‘एनआयए’च्या ताब्यात असलेला वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे याने शिवसेनेचे नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनाही खंडणी वसुलीच्या प्रकरणात आणून उभे करीत महाविकास आघाडी सरकारवर आणखी एक ‘लेटरबॉम्ब’ टाकला. चौकशी बंद करण्यासाठी सैफी बुर्‍हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टकडून ५० कोटी रुपये वसूल करण्यास परब यांनी मला सांगितले होते आणि महापालिकेने ब्लॅकलिस्ट केलेल्या कंत्राटदारांकडूनही प्रत्येकी २ कोटी गोळा करण्यास सांगितले, असा खळबळजनक जबाब वाझे याने नोंदविला आहे.

वाचा : ‘ट्रकभर पुरावे’, ‘पाठीत खंजीर’ ते... शरद पवारांवरील आरोपांचे पुढे काय झाले?

या प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सचिन वाझे प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे. वाझेचे पत्र गंभीर असून या पत्राची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महाराष्ट्रात जे घडतंय ते राज्य आणि पोलिसांच्या प्रतिमेसाठी योग्य नाही, असाही टोला त्यांनी लगावला आहे. 

कोरोना रुग्णांसाठी दिल्या जाणाऱ्या रेमिडेसिवीर औषधाचा काळा बाजार रोखला पाहिजे. यावर कारवाई झाली पाहिजे. लाट नसणाऱ्या राज्यांतून हे औषध मागविता येईल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. 

वाचा : ९ वी, ११ वीच्याही परीक्षा रद्द; ३१ लाख विद्यार्थी थेट पास!

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे पत्र सर्वांसमोर पोहोचले. लसीचे राजकारण बंद करावं असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात लससाठा किती शिल्लक आहे याची आकडेवारी दिली आहे. लोकांच्या जीवाशी खेळू नये, असा सूचक इशारा फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे.

देशमुख यांनी २ कोटींची मागणी केल्याचा नवा आरोप

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांचाही वाझेने पत्रातून पुनरुच्चार केला आहे. मला पुन्हा सेवेत घेण्यासाठी देशमुख यांनी २ कोटींची मागणी केल्याचा नवा आरोपही केला. सचिन वाझे याने विशेष एनआयए न्यायालयाला आपल्याला म्हणणे मांडायचे आहे, असे सांगितले होते. त्यावर न्यायालयाने त्यास लेखी स्वरूपात म्हणणे मांडण्यास सांगितले होते. तेच हे पत्र असल्याची माहिती मिळते. या पत्रावरून मॅजिस्ट्रेटसमोर सचिन वाझे याचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. लिहिलेल्या या पत्रावरून वाझेने घुमजाव करू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे वाझे याच्या या जबाबाची चौकशी लागल्यास अनिल परबदेखील या चौकशीच्या फेर्‍यात अडकण्याची दाट शक्यता आहे.

वाचा : कटात सामील असल्याने मनसुखची हत्या