Fri, Sep 25, 2020 19:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोकणात गणपतीसाठी रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा; उद्या विशेष गाडी सुटणार 

कोकणात गणपतीसाठी रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा; उद्या विशेष गाडी सुटणार 

Last Updated: Aug 14 2020 11:41AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

कोकणात गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वे गाडयांच्या वाहतुकीवरून गेल्या काही दिवसांत राज्य सरकार आणि रेल्वे यांच्यात रंगलेल्या वादावर अखेर शुक्रवारी परदा पडला. राज्य सरकारने कोकणात रेल्वे चालविण्याकरिता मध्य रेल्वेला मंजुरी दिली असून १५ ऑगस्ट रोजी रात्री सावंतवाडी करिता सीएसएमटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनल येथून विशेष गाडी सुटणार आहे. या गाडीचे आरक्षण शनिवारी सकाळपासून सुरु होणार आहे. या गाडयांचा चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी नाही तर कोकणातून परत येण्याकरिता देखील फायदा मिळणार आहे. 

वाचा : मुंबईत जोरदार पावसाला सुरूवात, वादळी‌ वाऱ्यासह मुसळधारेचा इशारा

गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी एसटी सोडल्यानंतर राज्य सरकारने विशेष गाड्या सोडण्याची परवानगी दिली. त्यानंतर राज्य सरकारने मध्य रेल्वेला ७ ऑगस्टला पत्र पाठवले. गाड्या चालवण्यासाठी रेल्वेने ९ ऑगस्टला रेल्वे बोर्डाकडून मंजुरीही मिळविली. मात्र गाड्या न चालवण्यासाठी ८ ऑगस्ट रोजी तात्पुरती स्थगिती देण्यासंदर्भात राज्य सरकारच्या संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तोंडी सूचना मध्य आणि पश्चिम रेल्वेला देण्यात आल्या. यानंतर १० ऑगस्टला मध्य रेल्वेने राज्य सरकारला पत्र पाठवून तात्पुरती स्थगितीबाबत लिखित स्वरुपात देण्याची मागणीही केली. हे पत्र रेल्वे मंडळ आणि राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकांनाही पाठवले. परंतु त्यानंतरही प्रतिसाद देण्यात आला नसल्याचे मध्य रेल्वेने गुरुवारी स्पष्ट केले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी राज्य सरकारने कोकणात गाड्या सोडण्यासाठी परवानगी दिली. 

वाचा : लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करुन घेत नाही ना?; शिवसेनेचा सवाल 

परंतु आता या गाड्यांनी कोण प्रवास करणार असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. कारण राज्य सरकारने १४ दिवसांचा विलगीकरणाचा नियम केल्याने अनेक चाकरमानी खासगी गाड्या करून कोकणात गेले. त्यासाठी त्यांनी हजारो रुपये खर्च केले. त्यानंतर सरकारने एसटीच्या वाहतुकीला परवानगी देताना १० दिवसांच्या विलगीकरणाची अट घातली. ज्यांना खासगी गाडीने जाता आले नाही त्यांनी एसटीने प्रवास केला. रेल्वेची विशेष वाहतूक १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.

 "