Thu, Nov 26, 2020 20:20



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यपालनियुक्‍त आमदारांचा निर्णय अद्याप प्रलंबित

राज्यपालनियुक्‍त आमदारांचा निर्णय अद्याप प्रलंबित

Last Updated: Nov 22 2020 2:04AM

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी



मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यपालनियुक्‍त विधान परिषदेच्या 12 सदस्यांची वर्णी लावण्याचा निर्णय राजभवनाकडून 15 दिवसांनंतरही प्रलंबित ठेवण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 6 नोव्हेंबर रोजी 12 जणांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बंद लिफाफ्यात सादर केली होती. 

15 दिवसांत म्हणजेच 21 नोव्हेंबरपर्यंत ही यादी मंजूर करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याची मुदत शनिवारी रात्री संपली. मात्र, याबाबत राजभवनातून अद्याप कोणतीही हालचाल होत नसल्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, याबाबत आता पुढे काय करायचे, याचा निर्णय महाविकास आघाडीतील सर्व नेते एकत्र बसून घेतील, असे संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी सांगितले.

विधान परिषदेतील राज्यपालनियुक्‍त 12 जागा जून महिन्यात रिक्‍त झाल्या आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने राज्यपालांकडे नव्या नावांची शिफारस केली नव्हती. कोरोनाचे कारण सांगितले गेले असले, तरी यामागे राज्यपालविरुद्ध महाविकास आघाडी सरकार या सुप्‍त वादाची किनार होती. अखेर राज्य सरकारकडून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 12 नावांचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यात आला. तसेच या 12 नावांना 15 दिवसांत मंजुरी द्यावी, अशी विनंती सरकारने केली. मात्र, 15 दिवसांचा कालखंड लोटला, तरी राज्यपालांनी याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. राज्यपालनियुक्‍त जागांचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित असल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांची चलबिचल सुरू झाली आहे.

राज्यपालनियुक्‍त जागांबाबत माहिती देताना मंत्री अनिल परब म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपालनियुक्‍त जागांबाबत 15 दिवसांत निर्णय घ्यावा, अशी विनंती केली होती. परंतु, याबाबत राज्यपालांनी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता पुढे काय करायचे, याचा निर्णय महाविकास आघाडीतील सर्व नेते एकत्र बसून घेतील. राज्यपालांनी निर्णय न घेतल्यास राज्य सरकार कोर्टाचे दरवाजे ठोठावणार का? असे विचारले असता, महाविकास आघाडी सरकार योग्य तो निर्णय घेईल, असे परब यांनी स्पष्ट केले.