टिटवाळा : अजय शेलार
सतत दोन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे टिटवाळा येथील काळू नदीवर असलेला पूल सकाळी ११ .१५ च्या सुमारास पाण्याखाली होता. यामुळे येथील वाह्तूक व्यवस्था पूर्णता: बंद झाली होती. यामळे दहा ते बारा गावांचा टिटवाळा शहराशी संपर्क तुटला. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास पूल पाण्याखालीच राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
आठवडाभरातून दुसऱ्यांदा हा पूल पाण्याखाली गेला आहे. रविवारी देखील हा पूल जवळजवळ चार तास पाण्याखाली होता. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रात्रंदिवस मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे सर्वत्र नदी नाले भरून वाहत आहेत. मुरबाड व नदीच्या उगमस्थानाच्या ठिकाणी देखील पावसाचा जोर कायम होता. यामुळे काळू नदीला पूर आला आणि रूंदे गावा जवळील नदीवरील पुलारून पावसाच्या पुराचे पाणी गेल्याने हा पूल वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद झाला. गुरूवारी सकाळी ११ .१५ च्या सुमारास हा पूल पाण्याखाली गेल्याने शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल झाले आहेत. रूंदे, फळेगांव, आंबिवली, दानबाव, मढ, उशीद, हाळ, पळसोली, आरेळा, भोंगळपाडा आदी दहा ते बारा गावांचा सकाळी ११ वाजल्या पासून टिटवाळा शहराशी संपर्क तुटला आहे. हा रस्ता टिटवाळा स्थानक, कल्याण मुरबाड नगर हायवे तसेच वाशिंद पडघा मार्गे मुंबई- नाशिक या मुख्यमहामार्गांना जोडतो.
हा पूल पाण्याखाली गेल्याने या गावांतील लोकांना पर्यायी रस्ता खडवली मार्गी पंधरा ते वीस किमीचा अंतर पार करून आपल्या घरी पोहचावे लागेत. परंतु ज्यांच्याकडे खाजगी वाहने असतील त्यांनाच या मार्गी आपल्या घरी पोहचता येईल. कारण खडवली- फळेगांव-उशीद ही एसटी बससेवा तीन वर्षापासून बंद आहे. यामुळे या परिसराच्या आजूबाजूच्या गावतील बरेच नागरिक घरी जाण्यासाठी नदी किनारी पाणी ओसरण्याची वाट पाहत बसून आहेत.